जुलै महिन्याच्या अखेरीस तेलंगणाच्या अदिलाबाद जिल्ह्यातला सथनाळा जलाशय काठोकाठ भरला होता. कारंजीच्या गावकऱ्यांनी आता खरीप आणि रब्बी दोन्ही पिकांना पाणी मिळणार म्हणून आनंद साजरा केला होता. पण १६ आणि १७ ऑगस्टला २०० मिमि पाऊस कोसळला. सथनाला नदीवरच्या या जलाशयाच्या ऊर्ध्व आणि अध कालव्याच्या दोन्ही काठांवरच्या शेतांमध्ये पाणी घुसलं. पुढे जाऊन गोदावरीला मिळणाऱ्या पेनगंगेची सथनाला ही उपनदी. पावसाने पिकं – मुख्यतः कपास आणि थोडंफार सोयाबीन - धुऊन नेली आणि शेतात दगड धोंडे आणि वाळूचा थर जमा झाला.
जून आणि ऑगस्ट या काळात अदिलाबादमध्ये सर्वसाधारणपणे या दोन महिन्यात जेवढा पाऊस होतो, ८८० मिमि, त्याच्या ४४ टक्के जास्त पाऊस झाला. भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीवरून असं दिसतं की गेल्या वर्षी याच काळात या जिल्ह्यात २७ टक्के कमी पाऊस झाला होता. त्यामुळे २०१७ साली शेतकऱ्यांसाठी कमी पिकलं पण २०१८ मध्ये आतापर्यंत तरी काहीच पिकलेलं नाही.
त्यांच्यातलीच एक आहे जैनाड मंडळातल्या कारंजी गावची कुंटावार संगीता. सथनाळा धरणाच्या खालच्या भागात असलेलं हे सुमारे १३६० लोकसंख्येचं गाव आहे. जून महिन्यात तिने आणि तिचा नवरा गजानन यांनी पहिल्यांदाच पेरणी केली – कपास लावली – जानेवारी-फेब्रुवारी २०१९ च्या सुमारास कापूस वेचणीला येईल अशी आशा त्यांना होती.
आपल्या स्वतःच्या जमिनीत पेरणी करणारी संगीता आधी शेतमजूर होती. गजानन देखील वर्षाला रु. ८६,००० अशा रोजावर शेतमजुरी करत होता. संगीताही त्याच रानात काम करेल या अटीवर त्याला जमीनमालकाने कामावर ठेवलं होतं. तिला अधून मधून काम मिळायचं आणि दिवसाला रु. १२० रोज मिळायचा. “गेली तीन वर्षं आम्ही मालकाकडे काम करतोय,” ती सांगते. काम नसायचं तेव्हा मनरेगाच्या कामाचा आधार होता. “नाही तर मग मी [खाजगी कंत्राटदारासाठी पेनगंगेच्या पात्रातून] ट्रॅक्टरमध्ये वाळू भरायचं किंवा उतरवायचं काम करायचो.”








