पिली पारधी, पन्नाशीला टेकलीये. कस्तुरबा हॉटेलच्या गेटबाहेर पर्यटक येण्याची वाट बघत थांबलीये. सकाळचे ९ वाजलेत. हॉटेलचा चेक आउट टाइम. तिची सून अरुणादेखील तिथेच आहे. या दोघी जणी आणि पिलीचा मुलगा, इथे हमाली करतात.
जया पेढकरही तेच काम करते. इतर हमाल बायांप्रमाणे तिशीतली जया दिवसातून तीन चार वेळा डोक्यावर १० ते ४० किलोच्या बॅगा घेऊन हॉटेल ते दस्तुरी वाहनतळ अशा फेऱ्या करते. माथेरानच्या मुख्य बाजारातून हे अंतर साडेतीन किलोमीटर आणि डोंगरात दूरवर असलेल्या हॉटेल्सपासून अजूनच जास्त.





