एखाद्या ६० फूट उंच झाडाच्या फांदीवर बसून मध गोळा करायला काय लागतं, किंवा मुदुमलईच्या घनदाट अरण्यात जंगली हत्तींच्या संगतीत कसं काम करायचं किंवा खरं तर तब्बल ६५ वाघ जिथे आसपास वावरत असतात तिथे राहणं म्हणजे काय हे एम. मदन यांना चांगलंच माहित आहे.
आणि यातल्या कशाचंच त्यांना भय नाही. आजवर त्यांनी किती वाघ जवळून पाहिलेत असं त्यांना विचारताच ते हसतात आणि म्हणतात, “मोजायचं सोडून दिलंय मी!”
मात्र सध्या त्यांना घोर लागलाय तो एका वेगळ्याच संकटाचा. मुदुमलई अभयारण्याच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या बेन्ने या ९० उंबरा असणाऱ्या पाड्यावरच्या मदन आणि इतर रहिवाशांना लवकरच त्यांची ही पूर्वजांपासून असलेली जमीन आणि घरं सोडून जावं लागणार आहे. त्यांच्या आसपासच्या इतर सात पाड्यांचीही हीच कथा आहे.
मदन आम्हाला जंगलातलं त्यांचं घर दाखवतात. त्यांचं माती आणि गवताने शाकारलेलं घर मरिअम्मा देवीच्या देवळाशेजारी आहे. शेजारीच त्यांच्या पूर्वजांना दफन केलंय ती दफनभूमी आहे. तिथल्या झाडांनी त्यांच्या घरावर सावली धरलीये. दरीतल्या एका झऱ्याकडे ते बोट दाखवतात आणि त्यांच्या कुटुंबाचा भाजीचा मळाही. भुकेल्या प्राण्यांच्या हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी मळ्याभोवती काट्याकुट्यांचं कुंपण घातलंय. “हे आमचं घर,” ते म्हणतात.


