“विकणार नाही हँडलूम. आयुष्य काढलंय त्याच्यावर,” घराच्या मधोमध ठेवलेल्या सात फुटी हातमागाकडे बोट दाखवत वसंत तांबे म्हणतात. “याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचं कापड विणू शकता,” अगदी अभिमानाने ते सांगतात.
या सागवानी मागावर तांबे एका पंधरवड्यात ६६ मीटर कापड विणतात आणि महिन्याला १३० मीटर सूत वापरतात. या कापडाचे अगदी उत्तम दर्जाचे सदरे बनतात. गेली ६० वर्षं वेगवेगळ्या मागांवर त्यांनी हेच काम केलंय – आणि आजवर त्यांनी १ लाख मीटरहून जास्त कापड विणलंय.
आणि या एक लाख मीटरची सुरुवात झाली एका नऊवारी साडीपासून. आज ८२ वय असणारे तांबे जेव्हा १८ वर्षांचे होते तेव्हा ते पहिल्यांदा रेंदाळमधल्या एका कारखान्यातल्या मागावर शिकाऊ कामगार म्हणून साडी विणण्यासाठी बसले. “आम्हाला एक महिना कारखान्यात फुकट काम करावं लागायचं,” ते सांगतात.
लवकरच तांबे चार तासात एक नऊवारी साडी विणू लागले आणि दर साडीमागे सव्वा रुपया मिळू लागला. “जास्तीत जास्त पातळं विणण्याची स्पर्धा लागायची. सर्वात जास्त म्हणजे एका आठवड्यात २१ साड्या,” तेव्हाच्या आठवणी ते सांगतात. १९६० ते ७० च्या त्या काळात त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अशी काही करामत केली की २ रुपये बोनस मिळायचा.
कारखान्यातलं हे प्रशिक्षण गरजेचं होतं कारण तांबेंच्या कुटुंबातलं इतर कुणीच विणकाम केलेलं नव्हतं. त्यांचं कुटुंब धनगर समाजाचं आहे, ज्यांची नोंद भटक्या जमातीत करण्यात येते. वसंत तांबेंचे वडील शंकर तांबे गवंडीकाम करायचे, आणि आई सोनाबाई शेतात मजुरी करून घरचं बघायची. “मला घराच्या छतावरून खाली पडायचं भ्या होतं,” तांबे सांगतात, त्यांनी गवंडी काम का केलं नाही त्याचं हे कारण. “म्हणून मी वेगळं काही तरी करण्याचा निर्णय घेतला.”










