मायलापूरच्या बारक्याशा गल्लीत, छोट्याशा खोलीत कर्नाटक संगीताचे स्वर भरून राहिलेत. निळ्या रंगाच्या भिंतींवर हिंदू देवतांच्या तसबिरी लावल्या आहेत, फणसाच्या लाकडाची खोडं आणि चामडं जमिनीवर इतस्ततः पसरले आहेत. जेसुदास अँथनी आणि त्यांचा मुलगा एडविन जेसुदास त्यांच्या या खोलीत कामात मग्न आहेत, हातोड्या, खिळे, सूर जुळवण्यासाठी लाकडी खुट्टा आणि लाकडाला चमक आणण्यासाठी एरंडाचं तेल असा सगळा जामानिमा त्यांच्या आजूबाजूला आहे. मध्य चेन्नईच्या या जुन्या निवासी भागात मंदिरांचा घंटारव ऐकू येतोय.
हे निष्णात कारागीर कर्नाटक संगीतामध्ये साथीला वाजवला जाणारा मृंदगम तयार करतात. “माझ्या पणजोबांनी तंजावूरमध्ये मृदंगम तयार करायला सुरुवात केली,” चेन्नईपासून ३५० किमीवर असणाऱ्या शहराचा संदर्भ घेत एडविन सांगतो. त्याचे वडील किंचित नजर उचलतात, हसतात आणि परत चामड्याच्या दोन तुकड्यांना छोटी छिद्रं पाडायला लागतात. त्यानंतर ते ही दोन्ही पानं घेतात आणि चामड्याच्या बारीक पट्ट्यांच्या सहाय्याने पोकळ खोडाच्या दोन्ही बाजूला ताणून बांधतात. चामड्याच्या जाड पट्ट्या विणून मृदंगाच्या खोडाच्या दोन्ही बाजूला ताणून बांधल्या जातात. एक अख्खा मृदंग तयार करण्याची प्रक्रिया (ते एकाच वेळी अनेक मृदंगांवर काम करत असतात) सात दिवस चालते.











