“मी माझ्या नवऱ्याचा मृतदेह आंध्र प्रदेशातल्या प्रकासममधल्या आमच्या गावी पामुरूला कशी घेऊन गेले ते तर मला आठवतही नाहीये. किंवा त्याचे अंत्यसंस्कार कसे पार पडले तेही. माझ्या सासऱ्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथे मला शॉक देण्यात आले, इतर उपचार करण्यात आले. तेव्हा कुठे मला काय चाललंय त्याचं भान आलं. माझा नवरा खरंच मरण पावलाय हे मान्य करायला मला दोन वर्षं लागली.”
या घटनेला आता १० वर्षं उलटलीयेत पण आजही तेव्हाच्या आठवणी सांगताना नागम्माला रडू कोसळतं. “माझ्या नातेवाइकांनी मला समजावलं की तुझ्या मुलींसाठी तुला जगावं लागेल, आणि तिथनंच माझा संघर्ष सुरू झाला. मला शेजारच्या कारखान्यात साफसफाईचं काम मिळालं, पण मला ते काम अजिबात आवडायचं नाही. माझे आई-वडील देखील सफाई कर्मचारी होते – माझे वडील सेप्टिक टँक आणि गटारं साफ करायचे, कचरा वेचायचे आणि आई झाडूकाम करायची.”
तमिळ नाडूमध्ये बहुतांश सफाई कर्मचारी आंध्र प्रदेशातले आहेत, ते तेलुगु बोलतात. तमिळ नाडूच्या अनेक भागांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी तेलुगु माध्यमाच्या शाळा आहेत.
नागम्मा आणि तिचा नवरा, दोघंही मूळचे पामुरु गावचे. “माझं लग्न १९९५ मध्ये झालं, मी १८ वर्षांची होते तेव्हा,” नागम्मा सांगते. “माझ्या जन्माच्या आधीच माझे आई-वडील चेन्नईला येऊन राहिले होते. माझ्या लग्नासाठी म्हणून आम्ही आमच्या गावी परतलो, काही वर्षं तिथे राहिलो आणि परत चेन्नईला आलो. माझ्या नवऱ्यानं बांधकामावर गवंडी म्हणून काम करायला सुरुवात केली. सेप्टिक टँक साफ करण्यासाठी बोलावणं आलं तर तो जायचा. मला जेव्हा कळालं की तो गटारात काम करतो म्हणून, मी कडाडून विरोध केला. त्यानंतर तो असली कामं करायला जातो ते त्याने मला सांगायचंच थांबवलं. २००७ साली जेव्हा तो आणि त्याचे दोन साथीदार सेप्टिक टँकमध्ये मरण पावले, तेव्हा कुणालाही अटक झाली नाही, त्यांच्या खुनासाठी कुणालाही जबाबदार धरण्यात आलं नाही. बघा, हा देश कसा वागवतो आम्हाला, आमच्या जीवाची काही किंमत आहे का नाही? आमच्या मदतीला कुणीही आलं नाही – ना सरकार, ना कुणी अधिकारी. अखेर सफाई कर्मचारी आंदोलनाने मला माझ्या हक्कांसाठी कसं लढायचं ते शिकवलं. मी आंदोलनाच्या संपर्कात आले २०१३ मध्ये.”
एकदा स्वतःचे हक्क समजल्यानंतर नागम्मा मोकळ्याने आणि ठामपणे त्यांचं म्हणणं मांडू लागली. ज्यांचा नवरा किंवा घरातलं कुणी जवळचं माणूस सेप्टिक टँकमध्ये मरण पावलंय अशा इतर स्त्रियांना ती भेटू लागली. “आयुष्याचा जोडीदार गटारात मरण पावला अशी मी काही एकटी नाही, अशा शेकडो बाया आहेत ज्यांचं दुःख माझ्यासारखंच आहे हे जेव्हा मला कळून चुकलं तेव्हा मग माझ्या दुःखालाच मी माझी ताकद बनवायला सुरुवात केली.”