कमल शिंदेंच्या दोन खोल्यांच्या घरात १५० किलोचं तांदुळाचं पोतं, १०० किलो गव्हाच्या कणकेचं पोते, ३०किलो बटाटे आणि ५०किलो कांदे गोळा झालेत. “हे सगळ्यांसाठी आहे,” ५५ वर्षांच्या कमल सांगतात. “आजचं जेवण सगळ्यांनी बांधून घेतलंय, बाकीच्या दोन दिवसाचं जेवण आम्ही वाटेत [रस्त्याच्या कडेला] बनवू.”
त्यांच्या गावातील ३०-४० शेतकऱ्यांनी हे सगळे गोळा केलं होतं, २० फेब्रुवारीला निघणाऱ्या त्यांच्या मोर्चाच्या दरम्यान, स्वयंपाकासाठी हे धान्य लागणार आहे, . दिंडोरी तालुक्याचे अखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक आप्पा वतने सांगतात. किसान सभा सरकारच्या विरोधात निघणाऱ्या या मोर्चाची मुख्य आयोजक आहे.










