सप्टेंबरच्या सुरुवातीला घोडामाराच्या बंदरावर जिथे फेरीबोटी थांबतात तिथे नुसती लगबग सुरू आहे. गडी, बाया, लहानगे आणि शेरडंसुद्धा बोटीतून उतरून आपापल्या कामाला जायच्या गडबडीत असल्यासारखी दिसतायत. भरतीच्या काळात नातेवाइकांच्या घरी किंवा इतरत्र निवाऱ्यासाठी गेलेले लोक पाणी ओसरल्यावर आपापल्या गावी परत येतायत. काकद्वीप या मुख्य बेटापासून सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशात, म्हणजेच डेल्टामध्ये असलेल्या या बेटावर पोचण्यासाठी ४० मिनिटं लागतात. महिन्यातून किमान दोन वेळा फेरी बोट लोकांची अशी ने-आण करते. पश्चिम बंगालच्या साउथ २४ परगणा जिल्ह्यातल्या या छोट्याशा बेटावर राहणाऱ्यांना जगण्यासाठीचा किती संघर्ष करावा लागतोय ते काही या प्रवासातून लक्षात यायचं नाही.
वारंवार येणारी चक्रीवादळं, समुद्राची वाढती पातळी आणि मुसळधार पाऊस अशा वातावरण बदलांच्या निदर्शक असलेल्या या सगळ्या घटनांमुळे घोडामाराच्या लोकांचं जगणं मुश्किल होऊन बसलं आहे. पूर आणि जमिनीची धूप यामुळे त्यांचं हे एकाकी बेट आता जणू हुगळी नदीच्या खाडीमधला एक तरंगता भूभाग बनून गेलं आहे.
मे महिन्यात यास चक्रीवादळ धडकलं तेव्हा सागर तालुक्याच्या घोडामारामध्ये फार मोठा विध्वंस झाला. २६ मे रोजी वादळ आणि भरतीचं पाणी बेटाच्या बंधाऱ्यांवरून आत शिरलं आणि १५-२० मिनटात संपूर्ण बेटावर पाणी भरलं. २०१९ साली बुलबुल आणि २०२० साली अम्फान वादळाचा फटका सहन केलेल्या रहिवाशांना पुन्हा एकदा वादळाचा विध्वंस सहन करावा लागला. घरं कोलमडून पडली, साठवलेली भातं, सुपारीच्या वाड्या आणि सूर्यफुलाची शेतं वाहून गेली.
खासीमारा घाटाजवळ असलेलं अब्दुल रौफ यांचं घर वादळाच्या तांडवामध्ये उद्ध्वस्त झालं. “ते तीन दिवस आमच्याकडे अन्नाचा कण नव्हता. पावसाचं पाणी पिऊन आणि प्लास्टिकच्या कागदांखाली आम्ही दिवस काढले,” रौफ सांगतात. इथून ९० किलोमीटरवर असलेल्या कोलकाता शहरात ते शिवणकाम करतात. ते आणि त्यांची बायको मध्यंतरी आजारी पडले तेव्हा “सगळ्यांना संशय होता की आम्हाला कोविड झालाय,” ते सांगतात. “अनेकांनी गाव सोडून पळ काढला होता,” रौफ म्हणतात. “आम्ही तिथेच अडकून पडलो होतो, सुरक्षित ठिकाणी जाताच आलं नाही.” तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर रौफ आणि त्यांच्या पत्नीला औषधोपचार मिळाले. “तुम्ही काहीही करून काकद्वीपला या असा बीडीओंकडून निरोप आला. तिथून त्यांनी अँब्युलन्सची सोय केली होती. [उपचारांवर] आम्हाला सगळा मिळून २२,००० रुपये खर्च आला.” तेव्हापासून रौफ आणि त्यांचं कुटुंब बेटावरच्या निवारा केंद्रामध्ये मुक्काम करतायत.
ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय त्यांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये हलवण्यात आलंय. मंदिरताला गावाच्या रहिवाशांना मंदिरताला बाजाराजवळच्या टँक ग्राउंडवरच्या निवारा केंद्रात हलवलं आहे. या बेटावरची ही सर्वात उंचावरची जागा आहे. काहींनी जवळच्याच एका गल्लीमध्ये निवासाची सोय केलीये. बेटावरच्या हाथकोला, चुनपुरी आणि खासीमारा भागातल्या ३० कुटुंबांना घोडामाराच्या दक्षिणेला असलेल्या सागर बेटावर तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तिथेच नव्याने घर वसवण्यासाठी त्यांना तिथे जमिनी देखील देण्यात आल्या आहेत.



























