ते २० किलोमीटर अंतर पार करून आले होते. पण एका मागोमाग एक रांगेत जाणाऱ्या त्यां चौघांच्या चालण्याची लय, डौल किंवा चपळाई किंचितही कमी झाली नव्हती. त्यांचे कपडेही ठेवणीतले, म्हणजेच कमीत कमी फाटलेले. विस्तीर्ण अशा कोरापुट प्रदेशातल्या मलकानगिरीच्या गावपाड्यात भरणाऱ्या आठवडी बाजारात पोचायची त्यांची घाई सुरू होती. आता ते तिथे पोचणार का नाही हा वेगळाच प्रश्न होता. कोण जाणो एखादा स्थानिक व्यापारी किंवा घेणेकरी त्यांना वाटेतच गाठून त्यांचा सगळा माल कवडीमोलाने खरेदी करेल. आणि त्यानंतर त्यांनाच तो सगळा माल बाजारापर्यंत वाहूनही न्यायला लावेल.
चार जणांची ही चौकडी आपला वेग मंदावत माझ्याशी बोलायला अखेर थांबली. हे काही मडकी घडवणारे परंपरागत कुंभार नव्हते. ते होते धुरुआ. या भागातले आदिवासी. माझ्याशी बोलणारे दोघं, माझी आणि नोकुल, यांनी मला पटवून सांगितलं की कुंभारकाम हा काही त्यांचा परंपरागत व्यवसाय नाही. एका सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यशाळेत ते ही कला शिकले. शेती आतबट्ट्याची होत चालल्याने त्यांनी विचार केला की चला हेही करून पाहू. त्यांनी घडवलेली मडकी साधी पण सुंदर आणि उत्तम दर्जाची होती. पण हा धंदाही फारसा काही चालत नव्हता, ते सांगत होते. “सगळीकडे लोक प्लास्टिकचे हंडे आणि बादल्या वापरायला लागलेत,” नोकुल तक्रारीच्या स्वरात म्हणतो. आणि ही गोष्ट आहे १९९४ सालची. तेव्हापासून आतापर्यंत एखाद्या चिरंतन, स्वयंभू आणि विविध रुपात अवतरणाऱ्या महासाथीसारखा प्लास्टिकचा फैलाव झाला आहे. आणि त्यावरचा उपाय अर्थातच अजून दृष्टीपथातही नाही.
“खरंय,” माझी म्हणतो. “साहुकार अनेकदा स्वतःच किंमत ठरवतो आणि भाव पाडून आमचा माल खरेदी करतो. पण कसंय, आम्हीही त्याचं देणं लागतो ना.” हाच व्यापारी बाजारात जाऊन हीच मडकी बऱ्या भावाला विकतो. जास्तीचे कष्ट काहीच नाहीत. तिथे त्याच्यासाठी पथारी टाकून विक्रीचं काम करणारे इतर आदिवासी त्याला भेटतातच. पण, अनेक बाजारांमध्ये स्वतः उत्पादकच त्यांच्या वस्तू विकताना दिसतात. जवळपासची काही गावं मिळून आठवड्याच्या वेगवेगळ्या दिवशी आपले बाजार भरवतात. त्यामुळे त्या गावात जरी आठवड्यातून एकच दिवस बाजार भरत असला तरी त्या परिसरात रोज कुठे ना कुठे बाजार भरतच असतो.



