सूर्यास्ताकडे काही त्यांचे डोळे लागलेले नाहीत. संधीप्रकाश सरतो, रस्त्यावरचे दिवे लागतात तरी आपल्या दोन खोल्यांच्या घराबाहेर बसलेल्या रंदावनी सुरवसे शून्यात नजर लावून बसल्या आहेत. कसनुसं हसून त्या सांगतात, “या इथे बसून हे त्यांच्या आवडीचे अभंग गायचे.”
विठ्ठलाची भक्तीगीतं, अभंग गात प्रभाकर सुरवसेंचा वेळ छान जायचा. दोन वर्षांपूर्वी, साठी पूर्ण झाल्यानंतर ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातून क्लार्क पदावरून निवृत्त झाले. तेव्हापासून दर रोज संध्याकाळी बीड जिल्ह्यातल्या परळीच्या आपल्या घरात प्रभाकर भजनं गायचे आणि आजूबाजूंच्यांना खूश करायचे.
हे असंच सुरू होतं, ९ एप्रिल २०२१ पर्यंत. आणि मग कोविड-१९ ची लक्षणं दिसायला लागली.
दोनच दिवसांनी त्यांना इथून २५ किलोमीटरवर असलेल्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर १० दिवसांनी श्वासासाठी तडफडत त्यांनी प्राण सोडला.
त्यांचा मृत्यू तसा अचानकच झाला. “सकाळी ११.३० वाजता मी त्यांना बिस्किट खाऊ घातलं होतं,” त्यांचा पुतण्या वैद्यनाथ सुरवसे सांगतो. ३६ वर्षांचे वैद्यनाथ परळीमध्ये चायनीज खाण्याचा गाडा चालवतात. “त्यांनी मला ज्यूस देखील मागितला. आम्ही गप्पा मारल्या. ते बरे वाटत होते. आणि मग दुपारी १.३० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.”
या मधल्या काळात वैद्यनाथ तिथे हॉस्पिटलमध्येच होते. ते सांगतात, दुपारी कधी तरी ऑक्सिजनचा दाब अचानक कमी व्हायला लागला. तोपर्यंत छान गप्पा मारणारे, उत्साहात असलेले प्रभाकर श्वास घ्यायला धडपडू लागले. “मी अजीजीने डॉक्टरांना बोलावलं, पण कुणीही लक्ष दिलं नाही,” वैद्यनाथ सांगतात. “त्यांना श्वास घ्यायला जड जात होतं, आणि थोड्या वेळातच ते गेले. मी त्यांची छाती दाबली, पाय चोळले, पण काहीच उपयोग झाला नाही.”










