मदुरै जिल्ह्यातील तृतीयपंथी लोककलावंतांसाठी वर्षाचे पहिले सहा महिने कळीचे असतात. या काळात गावात जत्रा आणि मंदिरांत सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. पण टाळेबंदी दरम्यान मोठ्या सार्वजनिक समारंभांवर प्रतिबंध आल्यामुळे तमिळनाडूतील जवळपास ५०० तृतीयपंथी महिला कलावंतांना प्रचंड नुकसान झालंय.

मागी ही अशीच एक कलावंत आहे. मदुरै शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेलं विलंगुडी येथील तिचं दोन खोल्यांचं घर हे इतर तृतीयपंथी महिलांसाठी एकत्र जमायची आणि विसाव्याची जागा आहे. पेरणीनंतर बीज अंकुरलं की त्याचा सोहळा म्हणून पारंपरिक कुम्मी पाटू गाणी सादर करणाऱ्या तृतीयपंथी महिला या जिल्ह्यात आहेत. त्यातलीच एक आहे मागी. तमिळनाडूत जुलै महिन्यात होणाऱ्या दहा दिवसांच्या मुलैपारी उत्सवादरम्यान पाऊस, जमिनीची सुपीकता आणि चांगलं पीक यावं म्हणून या गाण्यातून गावदेवीची प्रार्थना केली जाते.

तिच्या सगळ्या मैत्रिणी आणि सोबतिणी या गाण्यांवर ठेका धरतात. बराच काळ त्यांच्यासाठी हे एक उत्पन्नाचं साधन होतं. पण महामारीमुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे जुलै २०२० आणि यंदाच्या महिन्यातही हा उत्सव साजरा करण्यात आला नाही. (पाहा: मदुरैतील तृतीयपंथी लोककलावंतांची व्यथा ) आणि त्यांचं नेहमीचं उत्पन्नाचं साधन – मदुरै किंवा अगदी बेंगळुरूमध्ये आजूबाजूच्या दुकानांत जाऊन बाजार मागणं – देखील ठप्प झालं. त्यामुळे टाळेबंदी दरम्यान महिन्याची कमाई रू. ८,००० ते रू. १०,००० वरून चक्क शून्यावर आली.

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar


२४ वर्षीय के. स्वेस्तिका (डावीकडे) कुम्मी नृत्य कलावंत आहे. तृतीयपंथी महिला म्हणून तिचा होणारा छळ ती सहन करून शकली नाही, म्हणून तिने बीएचं शिक्षण सोडून दिलं – पण आपल्याला नोकरी मिळण्याच्या आशेने आजही तिला शिक्षणाची आस आहे. ती पोटापाण्यासाठी बाजार मागायची. पण टाळेबंदीमुळे हे कामही बंद झालं आणि त्यातून होणाऱ्या कमाईला देखील फटका बसला.

भव्यश्री (उजवीकडे), वय २५. हिच्याकडे बी कॉमची पदवी असूनसुद्धा तिला नोकरी मिळत नाहीये. तीसुद्धा कुम्मी नृत्य कलावंत असून तिच्या मते ती इतर तृतीयपंथी महिलांसोबत असते तेंव्हाच आनंदी असते. तिला मदुरैला जाऊन आपल्या घरच्यांना भेटावंसं वाटतं, पण ती जायचं टाळते, कारण: "मी घरी गेले की ते मला घरीच राहायला सांगतात. मला घराबाहेर कोणाशी बोलू देत नाहीत."

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

२३ वर्षीय आर. शिफाना (डावीकडे) एक कुम्मी नृत्य कलावंत असून तृतीयपंथी म्हणून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून तिने दुसऱ्या वर्षाला असताना कॉलेजला जाणं बंद केलं. केवळ आईच्या जिद्दीमुळे तिने पुन्हा अभ्यास सुरू केला आणि बीकॉमची पदवी घेतली. मार्च २०२० मध्ये टाळेबंदी होण्यापूर्वी ती मदुरैमध्ये बाजार मागायची आणि आपला चरितार्थ चालवायची.

३४ वर्षांची व्ही. अरसी (मध्यभागी) कुम्मी नृत्य कलावंत असून तिने तमिळ साहित्यात पदव्युत्तर शिक्षण, शिवाय एमफिल आणि बीएड ह्या पदव्या देखील घेतल्या आहेत. शाळेत तिला सगळे चिडवायचे तरीही तिने आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. मग तिने बऱ्याच ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले पण ती आजही बेरोजगार आहे. टाळेबंदी लागण्यापूर्वी तिलाही पोटापाण्यासाठी बाजार मागावा लागला होता.

३० वर्षीय इ. शालिनी (उजवीकडे) कुम्मी नृत्य कलावंत असून छळ असह्य झाल्याने इयत्ता ११ वीत असताना तिने शाळा सोडली. ती गेली १५ वर्षं बाजार मागतीये आणि नृत्य सादर करतीये, पण टाळेबंदी लागल्यापासून तिला पैशाची अडचण होऊ लागली. शालिनी म्हणते की तिला आपल्या आईची आठवण येते आणि तिच्यासोबत रहावंसं वाटतं. ती म्हणते की, "मला मरण येण्याआधी एकदा तरी बाबांनी माझ्याशी बोलावं, अशी इच्छा आहे."

S. Senthalir

एस. सेन्थलीर चेन्नईस्थित मुक्त पत्रकार असून पारीची २०२० सालाची फेलो आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन सेटलमेंट्ससोबत ती सल्लागार आहे.

यांचे इतर लिखाण S. Senthalir
Photographs : M. Palani Kumar

एम. पलनी कुमार २०१९ सालचे पारी फेलो आणि वंचितांचं जिणं टिपणारे छायाचित्रकार आहेत. तमिळ नाडूतील हाताने मैला साफ करणाऱ्या कामगारांवरील 'काकूस' या दिव्या भारती दिग्दर्शित चित्रपटाचं छायांकन त्यांनी केलं आहे.

यांचे इतर लिखाण M. Palani Kumar
Translator : Kaushal Kaloo

कौशल काळू याने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून रसायन अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली आहे.

यांचे इतर लिखाण कौशल काळू