एस. मुथुपेची शांतपणे त्यांच्यापुढच्या समस्यांचा पाढा वाचतात. चरितार्थासाठी त्या करगट्टम हा पारंपरिक कलाप्रकार साद करतात. रात्रभर नाचत ही कला सादर केली जाते आणि त्यासाठी कौशल्यासोबत दमसासही लागतो. तरीही या कलाकारांसोबत दुजाभाव केला जातो, त्यांना कलंकाचा सामना करावा लागतो आणि सामाजिक सुरक्षा फारशी काही नाहीच. ४४ वर्षांच्या मुथुपेचींनी या सगळ्यावर मात केली आहे.
त्यांचे पती १० वर्षांपूर्वी वारले. त्यानंतर त्यांनी एकटीने घर चालवलं, आपल्या कमाईतूनच दोन्गी मुलींची लग्नं लावून दिली. आणि अचानक कोविड-१९ चा घाला बसला.
करोना विषाणूबद्दल बोलताना त्यांच्या आवाजाला संतापाची आणि यातनांची धार चढते. “पाळ पोण करोना [हा दुष्ट करोना],” या आजाराला शिव्याशाप देत त्या म्हणतात. “कमाईच नाहीये कारण आमचे कार्यक्रमच थांबलेत. मला माझ्या मुलींपुढे हात पसरायला लागतायत.”
“गेल्या वर्षी शासनाने २,००० रुपये मदत जाहीर केली,” मुथुपेची सांगतात. “पण आम्हाला आमच्या हातात १,००० रुपयेच मिळाले. या वर्षी आम्ही मदुराईच्या कलेक्टरला विनंती केलीये, पण आजवर तरी काही मिळालेलं नाही.” २०२० च्या एप्रिल-मे मध्ये तमिळ नाडू शासनाने राज्याच्या लोककलावंत कल्याणकारी मंडळाकडे नोंद असलेल्या कलाकारांसाठी १,००० रुपयांची विशेष मदत दोन वेळा जाहीर केली होती.
महासाथ आली आणि तेव्हापासून मदुराई जिल्ह्यातले सुमारे १,२०० कलाकार हलाखीत गेले आहेत असं मदुराई गोविंदराज सांगतात. ते नावाजलेले कलावंत आहेत आणि लोककलांचे शिक्षक. करगट्टम सादर करणारे जवळपास १२० कलाकार अवनीपुरम शहरात, आंबेडकर नगर वस्तीत राहतात. मे महिन्यात मी तिथेच मुथुपेची आणि इतर काही जणांना भेटलो.
करगट्टम हा तसा गावाकडचा नृत्य प्रकार आहे. धार्मिक उत्सवांमध्ये तो मंदिरांमध्ये सादर केला जातो, सांस्कृतिक उत्सवांमध्ये, लग्न किंवा इतर कार्यक्रमांमध्ये आणि मयतीला देखील. हे कलाकार आदि द्रविड जातीचे दलित आहेत. या कलेवर त्यांचं पोट अवलंबून आहे.
करगट्टम हा समूहाने सादर केला जाणारा नाच प्रकार आहे. यात खूप सजवलेलं एक मडकं, करगम, डोक्यावर घेऊन स्त्रिया आणि पुरुष ही कला सादर करतात. रात्री १० ते पहाटे ३ असा हा नाच चालतो.














