“आमी मागच्या वेळेस कपिल पाटीलला मत दिलं होतं. काय झालं? गावात अजून प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. आणि हे रस्ते...जिंकल्यानंतर तो फिरकला सुदा नाही इथे. कशाला परत मत द्यायचं?” मारुती विशे विचारतात.
बाहेर ३८ अंश ऊन तापतंय, भर दुपारी टेंभरे गाव जवळजवळ ओस पडलंय. ७० वर्षांच्या विशेंच्या पक्कं बांधकाम केलेल्या घरात सहा पुरूष आणि तीन महिला जमलेत. विशेंच्या दिवाणखान्यात काही जण जमिनीवर चटई टाकून बसलेत तर काही प्लास्टिकच्या खुर्च्यांवर, खोलीच्या एका कोपऱ्यात त्यांच्या पाच एकर रानातून काढलेले तांदूळ गोण्यांमध्ये साठवून ठेवलेत. जमा झालेले सगळेच शेतकरी आहेत, प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या दोन ते पाच एकर जमिनीवर भात आणि भाज्यांचं पीक घेतात. “बसून आपन बोललं पाहिजे कुनाला मत द्यायचं ते,” ६० वर्षांचे रघुनाथ भोईर म्हणतात.
महादू भोईर, वय ५२, यांच्या मते या चर्चेतून काहीच निष्पन्न होणार नाही आहे. “भाजपाला पाच वर्ष दिली, पण त्यांनी ही वर्षं वाया घालवली. आता काँग्रेसला पाच वर्ष द्या आणि त्यांना पन वाया घालू देत. काय फरक नाही. सगळे सारखेच.”











