"आयुष्यात मी फक्त एकाच अचंबित झालो आहे," मंगल सिंह यांच्या पाण्याच्या टर्बाईनचं वर्णन करताना ६० वर्षीय भैय्या कुशवाहा म्हणतात. उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील दशरारा गावातली ही एक तप्त दुपार आहे. भैय्या आपल्या १५ एकर शेतातील एका कोपऱ्यात गहू पेरत आहेत. "तीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, टर्बाईन येईपर्यंत आणि पाणी देणं [काही काळाकरिता] सोपं होईपर्यंत ही जमीन तेव्हा पडक होती."
टर्बाईन काम कसं करते हे सांगण्याआधी ते जरा गटपटतात. "मी शाळा शिकलेलो नाहीये," ते पुटपुटतात. १९८७ साली त्यांनी सजनाम नदीवर, त्यांच्या शेताजवळ, स्थानिक मजुरांनी बांधलेल्या एका आड-धरणावर एक लाकडी चाक पाहिलं. "ते चाक एका 'गिअरबॉक्स'ला जोडलं होतं, आणि पाणी वाहायला लागलं की चाक फिरायचं आणि पाणी आमच्यापर्यंत [१-२ किमी दूर] पोहोचायचं. मला फक्त एवढंच करावं लागायचं की त्या यंत्रातून पाण्याचा पुरवठा चालू किंवा बंद करायला लाकडी 'गेट' घालावी लागायची."
पण या यंत्राचं त्यांना इतकं आश्चर्य वाटलं नाही, जितकं त्यानंतर झालेल्या गप्पांचं वाटलं: “मी त्यांना विचारलं की किती खर्च येणार, ते म्हणाले की सगळं फुकट होतं. टर्बाईनला पाणी उपसायला ना डिझेल लागतं ना वीज. मला धक्काच बसला.”
*****
मंगल सिंह, ७१, ललितपूर जिल्ह्यातील बार प्रभागात भेलोनीलोध गावातील एका जमीनदारी कुटंबातले आहेत. एका शेतकरी समुदायात लहानाचे मोठे होत असताना, बुंदेलखंडमधील त्यांच्या आणि इतरही गावांमध्ये पाण्यावर अवलंबून राहिल्याने गरिबी किती वाढली होती, याची त्यांना जाणीव होती. सजनाम नदीतून पाणी तर यायचं, पण ते उपसायला डिझेल किंवा वीज लागायची - अर्थात बक्कळ भांडवलाची गुंतवणूक.














