मारुती व्हॅन भरलीये आणि निघतेच आहे. मिळेल त्या जागेत शेतकरी बसलेत, काही जण चक्क दुसऱ्यांच्या मांडीवर. त्यांच्या बॅगा आणि काठ्या मागच्या सीटमागच्या चिंचोळ्या जागेत कोंबून ठेवल्या आहेत.
पण मंगल घाटगेंच्या शेजारची एक सीट मात्र चक्क रिकामी आहे. त्या कोणालाही तिथे बसू देत नाहीत – ती ‘रिझर्व’ केलीये. आणि मग मीराबाई लांगे व्हॅनपर्यंत येतात आणि ती रिकामी जागा पटकवतात. साडी नीटनेटकी करतात णि मंगल त्यांना कवेत घेतात. दार लागतं आणि मंगल ड्रायव्हरला म्हणतात, “चल, रे.”
५३ वर्षांच्या मंगल आणि ६५ वर्षांच्या मीराबाई, दोघी नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या शिंदवड गावच्या. पण गेल्या काही वर्षांत त्यांची जी मैत्री झालीये ती काही एका गावच्या आहेत म्हणून नाही. “गावात कसं घरात, रानात आम्ही कामातच असतो,” मंगल सांगतात. “निदर्शनं असली की कसं गप्पा मारायला वेळ भेटतो.”
मार्च २०१८ मध्ये नाशिकहून मुंबईला चालत आलेल्या किसान लाँग मार्चमध्ये त्या एकत्र होत्या. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये दिल्लीत भरलेल्या किसान मुक्ती मोर्चालाही त्या गेल्या होत्या. आणि आता नाशिकहून दिल्लीला निघालेल्या चारचाकी जत्थ्यासोबतही त्या निघाल्या आहेत. या निदर्शनांमध्ये का जाताय असं विचारल्यावर मंगल म्हणतात, “पोटासाठी.”
देशाच्या राजधानीच्या वेशीवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी हजारो, लाखो शेतकरी केंद्राने या वर्षी सप्टेंबर महिन्यात संसदेत रेटून पारित केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करतायत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि एकजुट व्यक्त करण्यासाठी २१ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्रातून सुमारे २००० शेतकऱ्यांचा जत्था नाशिकहून १४०० किलोमीटर दूर दिल्लीच्या दिशेने निघाला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न अकिल भारतीय किसान सभेने हा जत्था आयोजित केला आहे.
तर या झुंजार आंदोलकांमधल्या दोघी म्हणजे मंगल आणि मीराबाई.





