पुराचं पाणी वाढायला लागलं तेव्हा पार्वती वासुदेव यांनी घर सोडताना त्यांच्या पतीची टोपी तेवढी घेतली. “आम्ही फक्त टोपी आणि चिपळी आणलीया. काही होऊ द्या, टोपी सोडून जाणंच शक्य नाही,” त्या म्हणतात. टोपीवर मोरपिसं लावलीयेत. पहाटे गाणी गाताना गोपाळ वासुदेवांच्या डोक्यावर ही टोपी असतेच.
९ ऑगस्ट रोजी, सत्तरी पार केलेले गोपाळ वासुदेव शाळेच्या एका वर्गाच्या कोपऱ्यात बसले होते, चेहऱ्यावरचं दुःख लपत नव्हतं. “माझी तीन शेरडं गेली आणि एकाला कसं तरी सोबत आणलं, तेही जगेल असं वाटत नाही,” ते म्हणतात. गोपाळ वासुदेव समाजाचे आहेत, पहाटे दारोदारी जाऊन कृष्णाची भजनं गाऊन भिक्षा मागायची हे त्यांचं काम. पावसाळ्यात कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या आपल्या भेंडवडे या गावी ते शेतमजुरी करतात. “महिना झाला, जोरदार पावसामुळे रानानी कामं नव्हती आणि आता परत पुराचं पाणी शिरलंया,” पाणावलेल्या डोळ्यांनी ते सांगतात.
भेंडवड्याच्या शेतकऱ्यांनी पाऊस लांबल्यामुळे खरिपाच्या पेरण्या जुलैपर्यंत पुढे ढकलल्या होत्या. एरवी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. पण पाऊस आला तो असा काही की एका महिन्यातच सोयाबीन, भुईमूग आणि ऊस पाण्याखाली गेला.
आसिफला कधी वाटलंही नसेल की एरवी लग्नाचे फोटो काढण्यासाठी वापरलेल्या त्याच्या ड्रोन कॅमेऱ्याचा उपयोग लोकांची सुटका करण्यासाठी होईलः ‘आम्ही एकही जीव जाऊ देणार नाही. जनावरं देखील आम्ही वाचवू’
२ ऑगस्ट रोजी पुराचा तडाखा बसलेल्या महाराष्ट्राच्या एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या २०० ते २५० गावांपैकी एक म्हणजे भेंडवडे. पुराचं पाणी ११ ऑगस्टपर्यंत ओसरलं नव्हतं.
भेंडवड्याचे सरपंच, काकासाहेब चव्हाण सांगतात की ४,६८६ लोकसंख्या असणाऱ्या या गावातली ४५० कुटुंबं आणि २५०० लोकांना गावातल्या आणि आसपासच्या शाळांमध्ये आणि गावाच्या वेशीपाशी असणाऱ्या सरपंचांच्या घरात हलवण्यात आलं आहे जिथे पाणी पोचलं नव्हतं.
वासुदेव त्यांची पत्नी पार्वती आणि कुटुंबासोबत ३ ऑगस्ट रोजी गावातल्या सरकारी माध्यमिक शाळेत आले. चार दिवसांनी जेव्हा शाळेतही पाणी यायला लागलं तेव्हा त्यांना गावाबाहेरच्या प्राथमिक शाळेत जावं लागलं. सत्तरीच्या असणाऱ्या पार्वतींनी ९ ऑगस्ट रोजी मला सांगितलं, “आठवडा झाला, आम्ही हे असं घर सोडून राहतोय. आम्हाला महिनाभर तरी इथेच रहावं लागणार आहे. आज एक पोरगा पोहत आला आणि म्हणाला की आमचं घर पडलं म्हणून.”
भेंडवड्यातली त्याची टीम किंवा राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करूनही गावातली किती तरी जनावरं मरण पावली. भेंडवड्यात कुणाचाही जीव गेला नसला तरी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये ४० जणांना आपले प्राण गमवावे लागले असं पुणे विभागीय आयुक्तांनी सांगितल्याचं वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरून समजतं. चार लाखांहून अधिक जणांना तात्पुरत्या शिबिरांमध्ये हलवण्यात आलं. किती एकरावरचं पीक उद्ध्वस्त झालंय याचा खात्रीशीर अंदाज अजून काढण्यात आलेला नाही.
अनुवादः मेधा काळे