एक वर्षभरापूर्वी, २०१७ च्या मे महिन्यात सारिका आणि दयानंद सातपुतेंनी मनात नसतानाही मुक्काम हलवला. “तो निर्णय भीती आणि असुरक्षिततेच्या भावनेतून घेतलेला होता,” ४४ वर्षीय दयानंद सांगतात.
लातूर जिल्ह्यातल्या त्यांच्या मोगरगा गावात दलित समाजाने ३० एप्रिल २०१७ रोजी आंबेडकर जयंती साजरी केली होती. “दर वर्षी बाबासाहेबांच्या जयंतीनंतर [१४ एप्रिल] काही दिवसांनी आम्ही कार्यक्रम घेतो,” दयानंद सांगतात.
मोगरगा गावाची लोकसंख्या सुमारे २,६०० इतकी आहे – बहुसंख्य मराठा आणि सुमारे ४०० दलित. यातले बहुतेक महार आणि मातंग जातीचे. मराठ्यांची वस्ती मुख्य गावात तर दलितांची गावच्या कडंला. काहीच दलित कुटुंबांकडे स्वतःच्या मालकीची थोडीफार जमीन आहे आणि बहुतेक जण मराठा शेतकऱ्यांच्या रानात मजुरी करतात. शेती मुख्यतः ज्वारी, तूर आणि सोयाबीनची आहे. काही जण १० किलोमीटरवच्या किल्लारी शहरात मजुरी किंवा सुतारकाम करतात.
मात्र गेल्या वर्षीच्या कार्यक्रमानंतर सगळाच विचका झाला. “कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी [पंचायतीने] ग्राम सभा बोलावली,” दयानंद सांगतात. “काही जण सरळ आमच्या घरात घुसले, आम्हाला धमकावलं आणि ग्राम सभेला उपस्थित राहण्याचा आदेश देऊन गेले. जेव्हा आम्ही [पंधरा एक लोक] दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामसभेला गेलो तेव्हा त्यांना आम्हाला चिथवण्यासाठी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा द्यायला सुरुवात केली.”







