दक्षिण मुंबईच्या भुलेश्वरमधल्या चिंचोळ्या गल्ल्यांच्या चक्रव्यूहात एका कोपऱ्यात मन्झूर आलम शेख राहतात. पहाटे ५ वाजता उठून कामाला जायचं हा त्यांचा नेम. सडसडीत बांध्याचे, बहुतेक वेळा चौकडीची लुंगी नेसलेले शेख ५५० लिटरची पाण्याची लोखंडी टाकी ढकलत कावसजी पटेल टँकवर पाणी भरायला जातात. त्यांच्या घरापासून हा भाग एक किलोमीटरवर आहे. आणि त्यांचं घर - मिर्झा गालिब मार्केटजवळ, दूध बाजारमधल्या सार्वजनिक संडासच्या कोपऱ्यावर. उघड्यावर. ते आपली पाण्याची गाडी घेऊन दूध बाजारला येतात. गाडी लावायला जागा शोधतात आणि त्यानंतर जवळच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी पोचवायला सुरुवात करतात.
पन्नाशीचे मन्झूर आता अखेरच्या काही मोजक्या भिश्तींपैकी एक आहेत. पाणी पुरवणे हाच त्यांचा व्यवसाय. ते गेल्या तीस वर्षांपासून मुंबई महानगरातल्या या ऐतिहासिक अशा शहरात रहिवाशांना पिण्याचं आणि इतर वापरासाठीचं पाणी पुरवतायत. कोविड-१९ महासाथीने त्यांच्या व्यवसायावरच गदा आणली नाही तर तोपर्यंत भुलेश्वरमधे ते आणि त्यांच्यासारखे काही मोजके 'मशकवाले' म्हणजेच पाणके आपल्या 'मशक' किंवा 'मश्क' म्हणजेच पखालीतून पाणी वाटपाचं काम करत होते. अंदाजे ३० लिटर पाणी मावेल अशी चामड्याची खास पिशवी म्हणजे पखाल.
पखालीतून पाणी पुरवण्याची ही परंपरा “आता मेल्यात जमा आहे,” मन्झूर सांगतात. २०२१ साली त्यांनी पखालीऐवजी प्लास्टिकच्या बादल्या वापरायला सुरुवात केली. “जुन्या भिश्तींना आपापल्या गावचा रस्ता धरावा लागणार आणि तरुण मुलांना दुसरा काही तरी रोजगार शोधावा लागणार,” ते म्हणतात. उत्तर भारतातल्या भिश्ती या मुस्लिम समुदायाचं हे पारंपरिक काम. पर्शियन मूळ असलेल्या ‘भिश्ती’ या शब्दाचा अर्थ आहे, पाणी वाहणारा. या समुदायाला सक्का असंही म्हणतात. या अरबी शब्दाचा अर्थसुद्धा ‘पाणी वाहणारा’ किंवा ‘चषक वाहणारा’ असाच आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात (इथे यांना पखाली असं म्हणतात) या राज्यांमध्ये या समुदायाचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये होतो.

























