‘‘विणीच्या काळात लांडगे आमच्या गुरांवर हल्ले करतात. खरं तर आम्ही स्वतः त्या वेळी जितराबाबरोबर असतो, लांडग्यांना सहज मारू शकतो, म्हणजे त्यांनाच आमच्यापासून धोका असतो. पण तरीही ते शिकार करतात, कारण त्यांना आपल्या छोट्यांना खाऊ घालायचं असतं,’’ ताशी फुंतसोग आणि तुंदुप चोसगेल सांगतात. ग्या नावाच्या गावातले हे दोघं गुराखी आहेत. शिकार करणारे जंगली प्राणी आणि आपलं पशुधन जंगलात चारायला नेणारे पशुपालक, दोघंही एकमेकांसोबत जगत असतात. ताशी आणि तुंदुप लांडग्यांबद्दल जो विचार करतात, त्यात नेमकं याचंच प्रतिबिंब पडलेलं असतं.
हिंस्त्र, मांसभक्षी प्राण्यांपासून आपली शेरडं-मेंढरं वाचवण्यासाठी गावांमधले पशुपालक ‘शांगडोंग’चा वापर करत असत. भोवती दगड रचलेलं एका विहिरीसारखं बांधकाम असतं हे. ताशी फुंतसोग आणि तुंदुप चोसगेल सांगतात, ‘‘मी लहान होतो तेव्हापासूनची ही पद्धत मला आठवतेय. ऑक्टोबरपासून सुरुवात होत असे. आळीपाळीने प्रत्येकाच्या कळपातली एकेक मेंढी शांगडोंगच्या आत लांडग्यासाठी सावज म्हणून ठेवायची. सावज म्हणून ठेवलेल्या या जनावरांना खाऊ घालण्याची जबाबदारी जानेवारीपर्यंत आळीपाळीने गावातल्या प्रत्येक कुटुंबावर असायची. सावजात आपलं जनावर नसलं तरी त्यांना तो गावकरी रोज गवत आणि पाणी देत असे. लांडगा अडकलाच तर हाच गावकरी त्याला मारत असे.’’


