ओवी प्रकल्पाच्या या भागात आहेत हौसाबाई मांडेकर यांच्या ध्वनिमुद्रित ओव्या आणि छबाबाई सुतार यांचे व्हिडीओ : पुणे जिल्ह्यातल्या या दोघी पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या ओव्या गाताहेत. या आठवड्यात हजारो भक्त पंढरपूरची वारी करत असतील.
दरवर्षी आषाढात आळंदी आणि देहूवरून २१ दिवसांची वारी पंढरपूरकडे निघते. वर्षामागून वर्षे या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची परंपरा आहे आणि जातिभेदाचा अडसर नसलेली अशी ही परंपरा आहे.
या वारीविषयी अधिक माहिती ‘पारी’वर वारकऱ्याची वारी मध्ये आणि The enduring pull of people’s poets मध्ये वारकऱ्यांचे दैवते असलेले ज्ञानेश्वर आणि तुकाराम या संतकवींची माहिती मिळेल.
लोकसाहित्यातून लक्षात येतं की विठ्ठल हा खेडुतांचा, धनगरांचा देव होता. पण लोकांचा देव असूनही सारी पूजाअर्चा ब्राह्मणांच्या हाती होती आणि तरीही वर्षानुवर्षे वंचित आणि खालच्या जातीतील भक्तांना मंदिरात प्रवेश नव्हता. १९४७ मध्ये परिस्थिती बदलली; लेखक व शिक्षक असललेल्या पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींनी या भेदभावाच्या विरोधात ११ दिवसाचं उपोषण केलं.
ओवी प्रकल्पाच्या या भागातील काही कवितांत भक्तीरस गुंफलेला आहे त्याचबरोबर विट्ठल-रखुमाईच्या वैवाहिक जीवनाबद्दलच्या काही पारंपरिक गीते त्यांच्या एकत्र जीवनाबद्दलच्या कवयित्रींच्या कल्पना सांगतात.
ओवी प्रकल्पावर काम करणारी ‘पारी’ची टीम जेव्हा ३० एप्रिल २०१७ रोजी पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील लवार्डे गावात पोचली तेव्हा छबाबाई सुतार यांनी विट्ठल-रखुमाईमधील प्रेम आणि राग/विसंवाद/कुरबुर याबद्दलची गीते ऐकवली.



