२०१४ साली टेरी (द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट) या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, “१९०१-२००३ या काळातल्या पावसाच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यातल्या मोसमी पावसाच्या प्रमाणात [राज्यभरात] घट होत आहे, तर ऑगस्ट महिन्यातल्या पावसात वाढ होतीये... भरीस भर मोसमी पावसामध्ये अतिवृष्टीचा टक्का वाढत चालला आहे, तोही विशेषकरून मोसमाच्या पूर्वार्धात (जून व जुलै).”
असेसिंग क्लायमेट चेंज व्हल्नरेबिलिटी अँड अडाप्टेशन स्ट्रॅटेजीज फॉर महाराष्ट्रः महाराष्ट्र स्टेट अडाप्टेशन ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज या अभ्यासानुसार विदर्भासाठी कोणत्या गोष्टी बिकट ठरू शकतात त्या नोंदवण्यात आल्या आहेतः “पावसाची मोठी ओढ, पावसाच्या लहरीपणात वाढ आणि पाऊसमानामध्ये घट.”
भंडारा हा अशा काही जिल्ह्यांमधला एक जिल्हा आहे जिथे अतिवृष्टीचं प्रमाण १४ ते १८ टक्क्यांनी वाढू शकतं पण त्या सोबतच पावसाळ्यातल्या कोरड्या दिवसांमध्येही वाढ होऊ शकते. हा अभ्यास असंही सांगतो नागपूर विभागासाठी (ज्यात भंडाऱ्याचा समावेश आहे) तापमानाच्या सरासरीमध्ये ( वार्षिक तापमान सरासरी २९.१७) १.१८ ते १.४ अंश (२०३० पर्यंत) आणि २०१७ पर्यंत २.८८ ते ३.१६ अंश इतकी वाढ होऊ शकते. राज्याच्या एकूण विभागांमधली ही सर्वात जास्त वाढ आहे.
भंडाऱ्याच्या कृषी अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या या पावसावर अवलंबून असणाऱ्या जिल्ह्यातले बदल आता जाणवू लागले आहेत. या जिल्ह्याची नोंद शासकीय कागदपत्रांमध्ये आणि जिल्हा आराखड्यांमध्ये ‘चांगले सिंचन’ असणारा प्रदेश म्हणून केली जाते. कारण आहेत इथले पारंपरिक तलाव, नद्या आणि पुरेसा पाऊस. “पाऊस उशीरा सुरू होतोय, अशीच स्थिती इथे आता दिसू लागली आहे, याचा पेरण्यांवर आणि उत्पादनावर परिणाम होतो,” भंडाऱ्यातील विभागीय कृषी अधीक्षक, मिलिंद लाड सांगतात. “आमच्याकडे पावसाचे ६०-७० दिवस मिळायचे, पण साधारणपणे गेल्या दशकात हा आकडा जून-सप्टेंबर या काळासाठी ४०-४५ दिवसांवर आला आहे.” काही मंडळांमध्ये – २० महसुली गावांचं मिळून एक मंडळ बनतं – यंदा जून आणि जुलै महिन्यात केवळ ६ ते ७ दिवस पाऊस झाल्याचं निरीक्षण नोंदवतात.
“पावसाने ओढ दिली, तर तुम्ही उच्च प्रतीचा तांदूळ पिकवू शकत नाही,” लाड पुढे सांगतात. “रोपं २१ दिवसांची झाल्यानंतर जर लावण्या लांबल्या तर हेक्टरी दर दिवसाला १० किलो अशा दराने उत्पादन घटतं.”
पूर्वीची परंपरागत धूळपेरणी – बियांपासून रोपं तयार करून लावणी करण्याऐवजी मातीत बी फेकून पेरणी करण्याची पद्धत – पुन्हा एकदा या जिल्ह्यात रुळू लागली आहे. मात्र भातलावणीच्या तुलनेत अशा पेरणीत उगवणीची शक्यता कमी असल्यामुळे उतारा कमी पडू शकतो. पण जर पावसाने गुंगारा दिल्यामुळे भात रोपं वाया गेली तर जे नुकसान होतं त्यापेक्षा धूळपेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा तोटा कमी होतो.