“सातवा महिना भरलाय. डॉक्टर म्हणतात, फळं खा, दूध पी. आता सांगा मला, कसं आणि कुठून आणू मी हे? मला नदीवर जायला दिलं तर मी नाव चालवेन, माझं आणि माझ्या पोरांचं पोट भरेन,” सुषमा देवी (नाव बदललंय) सांगते. गावातल्या हापशापाशी ती उभी असते, आपला पाण्याचा नंबर यायची वाट पाहात. विधवा सुषमा सात महिन्यांची गर्भवती आहे.
नाव चालवेन? म्हणजे?... २७ वर्षांची सुषमा देवी निषाद समाजाची आहे. या समाजातले बहुतेक पुरुष नावाडी आहेत. नाव चालवून गुजराण करणारे. मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यात मझगवां तालुक्यातलं केवटरा गाव तिचं. गाव कसलं, वस्तीच खरं तर. केवटरामध्ये १३५ नावाडी आहेत. ४० वर्षांचा तिचा नवरा विजय कुमारही (नाव बदललंय) त्यांच्यापैकीच एक होता. पाच महिन्यांपूर्वी एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. सात वर्षं झाली होती त्यांच्या लग्नाला. सुषमा कधी नाव वल्हवायला शिकली नाही, पण विजयबरोबर ती अधूनमधून बोटीने नदीत फेरफटका मारायला जायची. त्यामुळे आपण बोट चालवू शकू, असा तिला विश्वास आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून इथे मंदाकिनी नदीच्या पात्रात एकही नाव दिसत नाहीये. या नदीनेच चित्रकूट उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यात वाटून दिलंय.
सूर्यास्तानंतर एका तासाने केवटरा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरचा पहिला दिवा लागला. प्लास्टिकची बादली घेऊन सुषमा आपल्या धाकट्या मुलासह गावातल्या हापशावर पाणी भरायला आली होती. आम्हाला ती तिथेच भेटली.
मंदाकिनी नदीच्या पात्रात होड्या चालवून निषाद आपलं पोट भरतात. चित्रकूट हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. दिवाळीच्या आसपास इथे लाखो यात्रेकरू येतात. निषाद नावाडी होड्यांनी त्यांना केवटरापासून एक किलोमीटरवर असलेला रामघाट, भरत घाट, गोएंका घाट अशा वेगवेगळ्या तीर्थस्थळांवर घेऊन जातात.
याच दिवसांत निषाद वर्षभरातली सर्वात जास्त कमाई करून घेतात. दर दिवशी ६०० रुपयांपर्यंत. एरवीच्या त्यांच्या कमाईच्या दुप्पट-तिप्पट.






