२०१४ साली ओदिशाच्या बिस्समकटक तालुक्यातल्या वन खात्याचा एक अधिकारी कांधुगुडा गावी गेला, गावकरी आणि वनखात्यामध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा करण्यासाठी. बैठकीला सगळ्या बाया आलेल्या पाहून आणि त्यातल्या वयस्कांनी घेतलेला पुढाकार पाहून कदाचित तो विस्मयचकित झाला असावा. भारतातल्या इतर कोणत्याही गावामध्ये कदाचित त्याची गाठ सभेसाठी आलेल्या बहुतेक सगळ्या पुरुष मंडळींशी आणि पुरुष सरपंचाशी गाठ पडली असती.
पण इथे, रायगडा जिल्ह्यामधल्या सर्वाधिक संख्या असणाऱ्या कोंध जमातीमध्ये मात्र (लोकसंख्याः ९,६७,९११, ज्यामध्ये ५,४१,९०५ अनुसूचित जमातीचे आहेत), महत्त्वाचे सगळे निर्णय बाया घेतात. वारसा हक्क पुरुषाकडूनच पुढे जात असला तरी या जमातीत बाया आणि गड्यांची आयुष्यं समान असावीत यावर भर देण्यात आला आहे. नियामगिरीच्या करंदीगुडा गावातल्या ६५ वर्षीय लोकोनाथ नाउरी यांनी सांगितल्याप्रमाणे, “तिथे डोंगरात राहणारा नियाम राजा (नियामगिरीचा देव) पुरुष तर इथली आमची गावदेवता [गावाच्या वेशीपाशी उभं केलेलं लाकडी देवक] बाई आहे. या दोघांच्या अस्तित्वामुळेच आमची भरभराट होतीये. या दोघांपैकी कुणालाही जरी इजा झाली तरी मानवी जीवनच संपून जाईल.”
कोंध आदिवासींमध्ये या तत्त्वाला धरूनच कामाची विभागणी केलेली आहे. गावाचा कारभार पाहणाऱ्या कुटुंब या संस्थेमध्ये बाया समान पातळीवर सहभाग घेतात आणि त्यांची मतं मांडतात. पुरुष शिकारीला जातात, शेती करतात मात्र समुदायाचं बाकी सगळं जग मात्र या बायाच चालवतात.






