शाहबाई घरत जवळपास वर्षभर कोरोनाव्हायरसचा पाठलाग करत होत्या – एके दिवशी त्यानेच त्यांना गाठलं. शाहबाई आशा कार्यकर्त्या असून महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील सुलतानपूर या आपल्या गावी घरोघरी जाऊन कोविडचा तपास करत होत्या. पण मेच्या अखेरच्या आठवड्यात ज्या गोष्टीची सर्वाधिक भीती वाटत होती ती खरी ठरली आणि त्यांना कोविड झाल्याचं निदान झालं.
३८ वर्षीय शाहबाईंना महामारी दरम्यान आपल्या कामातल्या जोखमीची जाणीव होती, पण त्याचे परिणाम काय होतील याची मात्र कल्पना नव्हती. त्यांना बाधा झाली आणि नंतर लगेचच त्यांच्या आईलाही संसर्ग झाला. नंतर त्यांच्या चार भाच्यांना. या आजारामुळे घरचे सगळेच चिंतेत पडले.
शाहबाई यांना बरं व्हायला काही आठवडे लागले. "माझे भाचेही बरे झाले, पण आईला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं," शाहबाई म्हणतात. त्यांच्या आईला आठवडाभर ऑक्सिजनवर ठेवावं लागलं. "तिच्या ट्रीटमेंटला २.५ लाख रुपये लागले. मी आपली २.५ एकर जमीन अन् थोडे दागिने विकून भरती केली."
आशा म्हणून त्यांचं काम कधीच सोपं नव्हतं, पण या महामारीमुळे ते आणखीच कठीण झालंय. "लोक धमकवायचे, शिवीगाळ करायचे. सुरुवातीला लोकं आपली लक्षणं लपवत होती," शाहबाई म्हणतात. "काम करताना मला गावात पुष्कळदा नको नको ते ऐकून घ्यावं लागलंय."
महाराष्ट्रात एकूण ७०,००० हून जास्त आशा कार्यकर्त्या आहेत. मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा पहिल्यांदा उद्रेक झाल्यापासून त्याचा प्रतिकार करण्यात त्या आघाडीवर आहेत. घरोघरी सर्वेक्षण करण्याव्यतिरिक्त त्या गावामध्ये फिरून लसीबद्दलचे गैरसमज देखील दूर करतात.












