“चाळून, चाळून पोटातलं लेकरू पुढे बाळवाटेकडे सरकवायचं.”
सुईण म्हणून केलेल्या कामाच्या स्मृती जाग्या झाल्या आणि तिचे डोळे लकाकले. गुणामाय मनोहर कांबळे, वय ८६. बोलता बोलता समोर जणू काही बाळंतपणं करणारी तरुण चलाख दाईच बसली असावी. “हातात काकणं घालतो ना, अगदी तसं!” बाळाला बाळवाटेकडे कसं सरकवत न्यायचं, तिथून ते कसं बाहेर येऊ द्यायचं ते तिने सांगितलं. आणि कसं ते दाखवताना तिच्या हातातल्या लाल बांगड्या किणकिणल्या.
गेल्या सत्तर वर्षांत वागदरी गावातल्या दलित समाजाच्या गुणामायने उस्मानाबाद जिल्ह्यात शेकडो स्त्रियांची बाळंतपणं अगदी सुखरुप पार पाडली आहेत. “हातचलाखी आहे माय,” ती म्हणते. चार वर्षांपूर्वी, वयाच्या ८२ व्या वर्षी तिने शेवटचं बाळंतपण केलं. “माज्या हाताला अपेश नाही. परमेसर पाठीशी हाय.”
गुणामायची मुलगी, वंदना सोलापूरच्या जिल्हा रुग्णालयात घडलेला किस्सा सांगते. गुणामायने तिथल्या एमबीबीएस डॉक्टरांसमोर तीन बाळंतपणं करून दाखवली होती. तिन्ही सिझेरियन व्हायच्या बेतात होती. “ते डॉक्टर बी म्हणू लाल्ते, ‘तुमी आमच्या पुढं आहात. आजी’,’” त्यांच्या चेहऱ्यावरचा अचंबा आणि आश्चर्य आठवून गुणामाय हसली होती.
ती फक्त बाळंतपणं करायची नाही. पार पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि उस्मानाबादहून तिला फोन यायचे. “लेकरांच्या डोळ्यात, काना-नाकात काही गेलं तर ते काढण्यात ती फार हुशार आहे. बी, मणी काही पण गेलं ना, लोक लेकरांना घेऊन येतात तिच्याकडे,” तिची नात श्रीदेवी काही महिन्यांपूर्वी आम्हाला सांगत होती. गुणामायच्या दृष्टीने हे तिचं कामच होतं. त्या पलिकडे तिला किती तरी औषधं माहित होती. पोटदुखीवर, कावीळ, सर्दी-खोकला, ताप अशा आजारांवर ती झाडपाल्याची औषधं द्यायची.









