सकाळचे आठ वाजलेत, रस्त्यात तशी शांतता आहे. पण एका कोपऱ्यातून मोठ्याने ठक ठक ऐकू येतीये. बाळप्पा चंदर धोत्रे एका पदपथावर पत्थरांच्या ढिगाऱ्यात बसून छिन्नी हातोड्याने दगड घडवतायत. त्यांच्या या तात्पुरत्या ‘कारखान्या’मागे लागलेल्या स्कूटर आणि रिक्षा थोड्याच वेळात कामावर जातील आणि मग बाळप्पादेखील काही तासांत इथून बाहेर पडतील – उत्तर मुंबईच्या कांदिवली पूर्व भागातल्या पदपथावर बसून घडवलेले खल बत्ते घेऊन.
चटण्या किंवा मसाला वाटायला-कुटायला लागणारा एक खलबत्ता किंवा पाटा वरवंटा घडवायला त्यांना तासभर लागतो. ते त्याला कल्लु रुब्बु म्हणतात, कानडीत. मराठीत खलबत्ता. काम पूर्ण झालं की एका मजबूत रेग्झिनच्या पिशवीत ते तयार खलबत्ते टाकतात आणि पदपथावरच्या आपल्या ‘कारखान्या’तून बाहेर पडतात. एका वेळी सोबत २-३ खलबत्ते आणि प्रत्येकाचं वजन १-४ किलो असतं. मग वर्दळीच्या रस्त्यांवर कोपऱ्यावर ते आपलं दुकान मांडतात. कधी कधी ते एखादा दगड सोबत ठेवतात. जर जास्तीचं गिऱ्हाईक आलं तर आयत्या वेळी तिथल्या तिथेच त्यांना एखादी वस्तू घडवून देता येते.
“लोक मला पत्थरवालाच म्हणतात,” बाळप्पा सांगतात.
लहान खलबत्ता २०० रुपयांना आणि मोठा ३५०-४०० रुपयांना विकला जातो. “एखाद्या आठवड्यात १०००-१२०० रुपयांचा धंदा होतो. कधी कधी काहीच नाही,” ते सांगतात. खरेदी करायला येणारे बहुतेकांना विजेवर चालणारा मिक्सर परवडत नाही किंवा ज्यांना आपल्या दिवाणखान्यात शोभेसाठी म्हणून या वस्तू मांडायच्या असतात. किंवा बाळप्पांच्या मंडळी, नागूबाईंसारखे, ज्यांना खलबत्ताच आवडतो. “मला काही मिक्सर आवडत नाही,” त्या म्हणतात. “चवच राहत नाही. यात कसं वाटण चवदार लागतं, ताजं.”








