“आमचे वाड-वडील कित्येक वर्षांपासून ही बांस गीतं गात आले आहेत,” असं पंचराम यादव सांगत होते. एका लोकगीतं गाणाऱ्या वादकांच्या वार्षिक मेळ्यात मी त्यांना भेटलो होतो. छत्तीसगडच्या मधोमध वसलेल्या भिलाई शहरात हा मेळा भरला होता.
तो मे महिना होता. काही वर्षांपूर्वी जत्रेच्या मैदानावर फेरफटका मारत असताना हवेत भरून राहिलेल्या या गीताच्या सुरांकडे मी आकर्षित झालो होतो. तीन पुरुषमाणसं बांस बाजा वाजवत होती. हे एक लांब, चकचकीत, सजावट केलेलं दंडगोलाकार लाकडी स्वरवाद्य असतं. राऊत मंडळी ते वाजवत होती. ते मुख्यतः दुर्ग (जिथं भिलाई शहर वसले आहे), बालोद, धमतरी, गरिआबंद, कांकेर आणि महासमुंद या छत्तीसगडच्या जिल्ह्यांमधील रहिवासी होते. ते यादव या ओबीसी जातीच्या पोटजातीतील आहेत.
तिन्ही वादक, वयाची पन्नाशी आणि साठी पार केलेले. वाद्यं वाजवत असताना, त्यांच्या सोबतचे काही गायक भगवान कृष्णावरचं एक गाणं पद्यात सादर करत होते आणि गात होते. तसंच मेंढपाळ मानतात अशा काही गुराख्यांबद्दलची गाणीही ते तितक्याच नादमधुर आवाजात गात होते.
४ ते ५ फूट लांब असणारा बांस बाजा, हे परंपरेनंच गुरख्यांचं वाद्य म्हणून ओळखलं जातं. कलाकार/बांसवादक (या समाजातील फक्त पुरुष हे वाद्य वाजवतात) सहसा स्वतःसाठी स्वतःच बांस बनवतात. काही वेळा स्थानिक सुतारांच्या मदतीने बनवतात. योग्य बांबू निवडायचा, तो तासून तयार करायचा, नंतर चार छिद्रं पाडायची आणि मग लोकरीच्या फुलांनी आणि रंगीबेरंगी कापडाच्या लहानशा तुकड्यांनी बांस सजवायचा.
पारंपारिक कार्यक्रमात एक कथाकार किंवा निवेदक आणि एक ‘रागी’, दोन बांस बाजावादकांना साथ देत असतात. निवेदक कथा गाताना, सांगताना रागी वादकांना आणि निवेदकाला/गायकांना त्याच्या स्फूर्तीदायक शब्दरचनांनी, वाक्प्रचारांनी साथ देत असतो. कथाकथनाकडे वळण्यापूर्वी सरस्वती, भैरव, महामाया आणि गणपती या देवी-देवतांना साकडं घालून कार्यक्रम सुरूवात होतो, जो अगदी अर्ध्या तासापासून ते तीन तासांपर्यंत चालू शकतो आणि परंपरेनुसार अगदी रात्रभरही! हे सारं कथेवर अवलंबून असतं.
बालोद जिल्ह्यातील गुंडेरदेही तालुक्यातल्या सिरी गावचे पंचराम यादव, प्रदीर्घकाळापासून बांस बाजा वादकांना त्यांच्या सादरीकरणात साथ देत आहेत. ते म्हणतात, “आपल्याला आपला वारसा जपला पाहिजे आणि आपल्या नव्या पिढीला त्याची ओळख करून दिली पाहिजे.” पण त्यांच्या समाजातील तरुणांना, विशेषतः शिकलेल्या मुलांना या परंपरांमध्ये रस नाही आणि केवळ वयस्कर माणसांनीच बांस बाजा गीत जिवंत ठेवलं आहे.
“आजकाल, तरुणांना हे आवडत नाही,” शेजारीच असलेल्या कानाकोट गावचे सहदेव यादव म्हणतात. “त्यांना या पारंपरिक छत्तीसगढी गाण्यांऐवजी फिल्मी गाण्यांमध्ये जास्त रस आहे. बासरी गीतांमध्ये, वेगवेगळ्या प्रसंगी, समारंभात आम्ही पारंपारिक दादरिया, कर्मा आणि इतर गाणी म्हणायचो. जेव्हा लोकं आम्हाला कार्यक्रमासाठी आमंत्रित करायची, तेव्हा आम्ही कितीतरी ठिकाणी जायचो. मात्र नवी पिढी याबाबत उदासीन आहे. आता आम्हाला क्वचितच बोलावणं येतं. म्हणूनच आमची अशी इच्छा आहे, की आमचं संगीत हे टीव्हीवरही (दूरदर्शन) प्रसारित झालं पाहिजे.”
काही वेळा, या मंडळाला दुर्मिळ असं निमंत्रणं मिळतं. सरकारी कार्यालयाकडून एखाद्या सांस्कृतिक उत्सवात किंवा यादव समाजाच्या कार्यक्रमामध्ये. थोडी फार बिदागीही मिळते. त्यांच्यापैकी कुणीही अर्थार्जनासाठी बाजा आणि गीतच्या कमाईवर अवलंबून राहू शकत नाही. काही वादक अल्पभूधारक आहेत, तर त्यातील बहुतेकजण गुरे चरायला नेतात. पंचराम यादव म्हणतात, “जर कुणी आम्हाला आमंत्रित केलंच तर आम्ही जातो, कारण बांस गीत वादन हा आमचा वारसा आहे. म्हणून आम्ही हे गाणं कधीही थांबवणार नाही."