१९ ऑगस्ट, जागतिक छायाचित्रण दिन. याच दिवशी आम्ही कर्नाटकातल्या बंदीपूर राष्ट्रीय उद्यानामधली काही अफलातून छायाचित्रं सादर करणार आहोत. इथलं वन, वन्यजीवन पहा पण पर्यटकांच्या किंवा अनुभवी छायाचित्रकारांच्या नाही तर अभयारण्याच्या भोवती राहणाऱ्या स्थानिकांच्या नजरेतून.
दुसऱ्याच्या कॅमेऱ्यात कैद होण्यापेक्षा लोक छायाचित्रांमधून आपली स्वतःची कहाणी कशी सांगू शकतात हे या फोटो-निबंधातून आम्हाला अधोरेखित करायचंय. विविध माध्यमांवर वन्यजीवांच्या अतिशय मोहक फोटोंची बरीच रेलचैल आहे पण जगातल्या काही धोकादायक तसंच धोक्यात असलेल्या प्राण्यांबरोबर आपलं आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या गोष्टी आहेत का तिथे? जिथे मानव आणि प्राणी दोघंही स्वतः भक्ष्य ठरण्याची किंवा दुसऱ्याला भक्ष्य करण्याची शक्यता आहे, त्या परिसरातलं जिणं नेमकं कसं असतं बरं? त्यांच्या गोष्टी कुणी सांगाव्या?
या ऊर्मीतूनच ही बंदीपूरची बखर तयार झाली. २०१५-१६ दरम्यान सहा महिन्यांच्या काळात सहा जणांनी – शेतकरी, मजूर, वन्यजीव तज्ज्ञ, आदिवासी आणि इतर – बंदीपूर अभयारण्याच्या वेशीवरचं आपलं रोजचं जगणं आणि अनुभव नोंदवून ठेवले. वाघ, बिबटे आणि हत्तींचा हा संपूर्ण जगातला एक महत्त्वाचा अधिवास आहे. शिवाय इतरही लक्षणीय जीव आहेत इथे.
या दस्तावेजाच्या निर्मितीतल्या अनेकांनी या आधी कधीही कॅमेरा वापरला नव्हता. एकमेकांना भेटून वन्यजीवांशी आपला कसा संबंध येतो – कामाच्या निमित्ताने, सहज खेळताना किंवा अचानक न ठरवता – याचे आपापले अनुभव त्यांनी मांडले. त्यांच्या निबंधातून दिसून येतं की बंदीपूरमध्ये समाजजीवनाचे अनेक पदर आहेत. हे जग लोकांसमोर आणणं, त्याचा आवाज ऐकणं ही देखील या प्रकल्पामागची प्रेरणा होती.
यातल्या काही छायाचित्रकारांच्या दृष्टीने वन्यजीव संवर्धनाच्या नावाखाली शासन इथल्या समुदायांच्या जमिनी पूर्वापारपासून कशा लाटत आलं आहे त्याचं प्रतिबिंब म्हणजे बंदीपूर. काहींच्या नजरेत बंदीपूरसारखे वन्यजीवांच्या संवर्धनासाठी विलग केलेले परिसर हा भारतातलं अस्तंगत होणारं वन्यजीवन वाचवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यांचे फोटो आपल्याला वन्यजीव संवर्धनाच्या संदर्भात सामाजिक न्यायाचा विचार करायला भाग पाडतात. इतकंच नाही तर भविष्यामध्ये संवर्धनाचा विचार करताना ‘तज्ज्ञ’ म्हणून कुणाचं बोट पकडायचं तेही हे फोटो आपल्याला सांगतात.








