आपल्या तीन शेळ्यांना प्रत्येकी तीन पिल्लं झालीयेत हे पाहून हुस्न आरांचा आनंद पोटात मावत नाहीये – ३० ऑक्टोबर रोजी सहा पिल्लांचा जन्म झाला आणि त्याच्या आदल्या आठवड्यात तीन पिल्लांचा. आपल्या आपण दूध पिण्याइतकी ती मोठी नाहीत त्यामुळे त्यांना पुरेसं दूध मिळावं म्हणून हुस्न आरा त्यांची अगदी डोळ्यात तेल घालून काळजी घेतायत. ही पिलं मोठी झाली की त्यांच्यापासून चांगलं उत्पन्न मिळणार हे त्या जाणून आहेत.
बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातल्या बाजपट्टी तालुक्यातल्या बर्री-फुलवरिया गावी हुस्न आरा राहतात. या पंचायतीच्या क्षेत्रात राहणाऱ्या सुमारे ७,५०० रहिवाशांपैकी बहुतेक जण गरीब आणि पोटापुरती शेती करणारे शेतकरी किंवा भूमीहीन मजूर आहेत. त्यांच्यापैकी एक आहेत हुस्न आरा.
अगदी लहान वयात त्यांचं त्यांच्या चुलत भावाबरोबर, मोहम्मद शब्बीरबरोबर लग्न झालं. पाच वर्षांपूर्वी ते हैद्राबादच्या एका चामड्याच्या वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यात काम करण्यासाठी गेले, त्या आधी तेही शेतमजुरी करायचे. “ते महिन्याला ५,००० रुपये कमवतात आणि कधी कधी २,००० रुपये घरी पाठवतात. त्यांना स्वतःसाठी पैसे लागतात, त्यामुळे त्यांच्याकडून नेहमी काही पैसे येत नाहीत,” हुस्न आरा सांगतात.







