त्या आपल्या समुदायासाठी लढतायत - बरेचदा त्यांच्याच धारणांविरुद्ध. त्यांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्या झटत आहेत, पण त्यांच्या रोजच्या कामाविरुद्ध. असं काम, ज्याचा त्यांना नायनाट करायचा आहे. त्यांना वाटतं की जुनी पिढी त्यांच्यापासून तुटलीये म्हणून त्या आता लहान मुलांवर लक्ष केंद्रित करत आहे. या आहेत कल्पना*, वय केवळ ३३ वर्षे, पण गोमासपलयम येथे लहान मुलांकरिता त्या एक मोफत शिकवणी चालवतात. ही तमिळनाडूतील मदुरै येथील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे - २३० घरांमधून दाटीवाटीने राहणारी अंदाजे ७०० कुटुंबं - आपल्या पर्यटन स्थळांसाठी जास्त प्रसिद्ध असलेल्या शहराच्या अगदी मधोमध.
हाताने मैला साफ करणारे, सफाई कर्मचारी (रस्ते झाडणारे) किंवा घरकामगार आणि सेवक यांची ही कुटुंबं. ही सगळी माणसं अरुंधतियार आहेत, दलित समुदायांतील सामाजिक उतरंडीत सर्वांत खालच्या पायरीवर असणारी. अनेकांना, विशेष करून इथे राहणाऱ्या वयस्कर लोकांना, वाटतं की त्यांच्या आयुष्यात तरी हे काम सुटणार नाही. “का ते माहित नाही, पण माझ्या लोकांना वाटतं की हे बदलणं काही अवघड आहे,” त्या म्हणतात. “मी या कामाबद्दल अभियान राबवलं की त्यांना राग येतो. त्यांना कुणाला दुखवायचं नाहीये.”
म्हणून मग कल्पना कोवळ्या मनांमध्ये वेगळ्या कल्पना रुजवू पाहताहेत. त्या एक शिकवणी केंद्र चालवतात – स्वतःच्या जोरावर - ४० मुलांकरिता, आठवड्याचे ५ दिवस. कधीकधी शनिवारी सुद्धा वर्ग घेतले जातात. हे केंद्र गोमासपलयम येथील एका सामुदायिक भवनात घेतले जातात, वेळ असते, सायंकाळी ५:३० ते ८:३०. “आपल्या पालकांचं काम हाती घेण्याचा विचारही मनात आणायचा नाही” असं त्या कायम या मुलांच्या मनावर बिंबवत असतात. “मी हे गेली तीन वर्षं करत आलेय,” त्या म्हणतात, “आणि इथे असेपर्यंत करत राहणार.” तीन वर्षांपूर्वी या ५० वर्षं जुन्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी पहिल्यांदाच काँक्रिटची पक्की घरं बांधण्यात आली. “या तथाकथित नूतनीकरणानंतर मी ह्या [तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या] सामुदायिक भवनाचा वापर मुलांना शिकवण्यासाठी करतीये.”



