“जेव्हा आमच्यासारख्या बाया आपली घरं आणि शेतं सोडून निदर्शनं करण्यासाठी शहरात येतो, तेव्हा समजून घ्या, त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागलीये,” अरुणा मन्ना म्हणतात. “गेल्या काही महिन्यांत असे कित्येर दिवस होते जेव्हा खायला अन्नाचा कण नव्हता. इतर दिवशी एक वेळचंच जेवण मिळत होतं. हे कायदे आणण्याची ही वेळ होती का? आमचा जीव घ्यायला ही महामारी [कोविड-१९] पुरेशी नव्हती वाटतं?”
४२ वर्षांच्या अरुणा मध्य कोलकात्यातल्या एस्प्लनेड वाय – चॅनेल या आंदोलन स्थळी बोलत होत्या. ९ ते २२ जानेवारी शेतकरी आणि शेतमजूर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या (एआयकेएससीसी) छत्राखाली एकत्र आले होते. विद्यार्थी, नागरिक, कामगार, सांस्कृतिक संघटना सगळे जण सप्टेंबर २०२० मध्ये संसदेत रेटून पारित केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र जमले होते.
अरुणा राजुआखाकी गावाहून इथे आल्या होत्या. साउथ २४ परगणा जिल्ह्यातल्या विविध गावांतल्या सुमारे १५०० महिला इथे आल्या होत्या. १८ जानेवारी रोजी शेती करणाऱ्या महिलांना समर्पित असलेला आणि त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी साजरा केल्या जाणाऱ्या महिला किसान दिवसासाठी त्या १८ जानेवारी रोजी कोलकात्यात आल्या होत्या. कुणी रेल्वेने, कुणी बसने तर कुणी टेम्पोमधून. शेतकरी आणि शेतमजूर महिला, महिलांच्या ४० संघटना आणि एआयकेएससीसीने पश्चिम बंगालमधल्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
आपला आवाज सगळ्यांपर्यंत पोचावा यासाठी कोलकात्याला आलेल्या या बाया दमल्या होत्या पण त्यांच्यातला संताप मात्र जाणवत होता. “मग, आमच्यासाठी कोण आंदोलन करणार? कोर्टबाबू? आमच्या वाट्याचं आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू!” ३८ वर्षीय सुपर्णा हलदर म्हणतात. श्रमजीबी महिला समितीच्या सदस्य असणाऱ्या हलदर यांचा टोला भारताच्या सरन्यायाधीशांना आहे. महिला आणि वृद्ध शेतकऱ्यांना कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलन स्थळाहून परत जायला ‘प्रवृत्त’ करावं असं विधान त्यांनी केलं होतं.
महिला किसान दिवस साजरा करण्यासाठी कोलकात्यामध्ये १८ जानेवारी रोजी सकाळी ११.३० ते ४ या वेळात महिला किसान मजदूर सभा आयोजित करण्यात आली होती. शेतीमधल्या स्त्रियांच्या समस्या, त्यांचे श्रम आणि जमिनीवरच्या आणि इतर हक्कांसाठीचा त्यांचा मोठा संघर्ष आणि या नव्या कायद्यांचे त्यांच्या आयुष्यावर होऊ शकणारे परिणाम या सगळ्या मुद्द्यांवर या सत्राचा भर होता.











