प्रह्लाद ढोके आपल्या गाई वाचवू पाहताहेत पण त्यासाठी त्यांना आपली तीन एकरांवरची पेरूची बाग मरू देणं भाग आहे.
“ही एक तडजोड आहे,” ७-८ फूट उंच वाढलेल्या पेरूच्या झाडांच्या रांगांसमोर उभे ४४ वर्षांचे ढोके अश्रुभरल्या डोळ्यांनी म्हणतात, “माझ्याजवळ होतं-नव्हतं ते सारं – बचत, सोनं - सगळं मी खर्चलं...पण आता झाडं वाचवण्यासाठी पाणी विकत घेणं मला शक्य नाही. त्याऐवजी मी गाई वाचवायचं ठरवलं. निर्णय कठीण असला तरी.”
एकदा विकल्या की पुन्हा गाई विकत घेणं सोपं नसतं आणि प्रत्येक एप्रिलमध्ये, बीड जिल्ह्यातील त्यांच्या वडगाव-ढोक गावाच्या बाहेरच गुरांची छावणी असते. महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळी कामाचा हा भाग आहे. प्रह्लादच्या १२ गाई (त्यात स्थानिक बाजारात प्रत्येकी एक लाखाला घेतलेल्या दोन गीर गाईही आहेत) छावणीत ठेवल्यात. पण झाडं सोडून देणं म्हणजे देखील भरून न येणारं नुकसानच आहे.
“माझा सगळ्यात मोठा भाऊ चार वर्षांपूर्वी लखनौला गेला होता; तिथून त्याने पेरूची रोपं आणली होती,” त्यांनी सांगितलं. ही बाग उभी करायला प्रह्लाद आणि त्याच्या कुटुंबियांना चार वर्षे लागली. पण लागोपाठचे दुष्काळ, २०१८ सालचा कोरडा पावसाळा यांमुळे शुष्क पडलेल्या मराठवाड्यातल्या वाढत्या पाणीटंचाईला तोंड देणं काही त्यांना जमलं नाही.
दर वर्षीच राज्यातील काही तालुक्यांत पाणी टंचाई आणि दुष्काळ असतो. पण २०१२-१३च्या शेती हंगामात (२०१२ पावसाळा कोरडा गेल्यामुळे २०१३ च्या उन्हाळ्यात पाण्याची प्रचंड टंचाई उद्भवली होती.) तीच परिस्थिती होती २०१४-१५ मध्ये आणि आता २०१८-१९ मध्येही. दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याची चणचण भासतेच पण २०१२ पासून मराठवाड्यात अवर्षणजन्य दुष्काळ (पावसाने दगा देणे), नापिकी (खरीप आणि रब्बी पिकं वाया) आणि पाण्याचं दुर्भिक्ष्य (भूजलातली घट) असे सर्व प्रकारचे दुष्काळच दुष्काळ सुरू आहेत!
वडगाव ढोक गेवराई तालुक्यात येतं. राज्य सरकारने ऑक्टोबर २०१८ मध्ये दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या १५१ गावातील ते एक. जून ते सप्टेंबर २०१८ मध्ये तिथे ५०% हूनही कमी पावसाची नोंद झाली. अनेक वर्षांच्या सरासरी ६२८ मिमी पावसाऐवजी फक्त २८८ मिमी पाऊस झाला. पिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या सप्टेंबर महिन्यात सरासरी १७० मिमी ऐवजी फक्त १४.२ मिमी पाऊस झाला.









