प्रसन्ना शबर गेली ३० वर्षं रिक्षा चालवत आहेत. ती रिक्षा - आणि कधीकधी छत्तीसगढची राजधानी रायपूर येथील रेल्वे स्थानकाजवळील पदपथ - हेच त्याचं घर. शहरात भाड्याने डोक्यावर छत घेण्याइतकी पुंजी त्यांच्याकडे कधीच नव्हती.
एक दिवस आम्ही भल्या पहाटे प्रसन्नांना भेटलो. ते आपल्या रिक्षावर बसून प्रवाशांची वाट पाहत होते. आम्ही त्यांच्या स्वतःच्या कोसलीत (ओडियाची एक बोली) त्यांच्याशी बोलायला लागलो, आणि त्यांनी खुशीत येऊन आपली कहाणी आम्हाला सांगितली.
प्रसन्ना रायपूरहून २०० किमी दूर असलेल्या ओडिशाच्या नौआपाडा जिल्ह्यातील सन्महेश्वर गावातून आले आहेत. पन्नाशीला टेकलेल्या प्रसन्ना यांनी अनेक दशकांपूर्वी या राजधानीत पहिल्यांदा रिक्षा चालवायला सुरुवात केली तेव्हा रिक्षाचं रोजचं भाडं रु. ५ होतं. आता ते रु. ४० झालंय. हजारेक रुपयांची कमाई झाली की ते आपल्या गावी जाऊन काही दिवस कुटुंबासमवेत घालवतात आणि नंतर शहरात परततात. गेली ३० वर्षं हेच चक्र सुरु आहे.
दररोज त्यांची रु. १०० - ३०० अशी कमाई होते. यातले रु. ११० च्या आसपास जेवणावर खर्च होतात. म्हणजेच चांगल्या कमाईच्या दिवशी एकूण कमाईतला एक तृतीयांश हिस्सा - आणि वाईट दिवशी पूर्ण १०० टक्के रोजच्या जगण्यावर खर्च होतो. थोडी जास्त कमाई झाली तर ते ६० रुपयांची दारू विकत घेतात. पण, रोज नाही, ते सांगतात. “काही वर्षांपूर्वी मी माझ्यासारख्या काही स्थलांतरित कामगारांच्या संगतीत राहून दारुडा अन् जुगारी बनलो होतो. मी आजारी पडलो आणि माझ्या घरच्यांना गावातल्या लोकांकडून ३,००० रुपये उधार घेऊन इथे येऊन मला सोडवावं लागलं. मी माझा धडा शिकलो आणि तेव्हापासून सावध झालोय.”
राज्यात १९६० पासून आलेल्या मोठ्या दुष्काळांनंतर प्रसन्नासारखे हजारो ओडिया लोक रायपूरला स्थलांतरित झाले. अनेक पिढ्यांपासून बरेचसे लोक रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या झोपडपट्ट्या आणि जवळपासच्या वस्त्यांमध्ये स्थायिक झालेत. पण, त्यांच्या आदिवासी कुटुंबातून शहरात येणारे प्रसन्ना हे पहिलेच.
त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, दोन मुलं, एक सून, एक नातवंड आणि त्यांचे म्हातारे वडील आहेत. “माझ्या वडलांच्या नावे फक्त १.१४ एकरच जमीन आहे,” ते म्हणतात. “माझी आई रोज १२ किमी चालत जाऊन जवळच्या एका शहरात सरपण विकायची, त्यातून वाचवलेल्या पैशातून तिने ८० डिसमल (०.८ एकर) जमीन विकत घेतली होती. पण, ती जागा आता माझ्या काकांची आहे.”



