दादर स्थानकात गाडी पोचेतो, तुळशी भगत जुनेऱ्यात बांधलेली पानांचे दोन बोजे घेऊन उतरण्यासाठी तयार असते. किमान ३५ किलोची ही गाठोडी एकेक करत ती फलाटावर टाकते, गाडी सुरु असतानाच. “हा बोजा आधीच टाकला नाही ना तर तेवढालं वजन घेऊन उतरताच यायचं नाही. गाडीत चढणाऱ्यांची घाई कसली असते,” ती सांगते.
मग तुळशी उतरते, फलाटावर तिची गाठोडी जिथे पडलीत तिथे जाते, त्यातलं एक डोक्यावर रचून गिचमिड गर्दीतून वाट काढत स्थानकाच्या बाहेर रस्त्यावरच्या फुलाच्या बाजारात पोचते. तिच्या ठरलेल्या ठिकाणी गाठोडं ठेवते आणि दुसरा बोजा आणण्यासाठी परत फलाटावर जाते. “एका वेळी एकच बोजा डोक्यावरून आणता येतो मला,” ती म्हणते. ही दोन्ही गाठोडी स्थानकातून बाजारात आणण्यातच तिचा अर्धा तास मोडतो.
पण तुळशीचं सगळं काम पाहिलं तर हा अर्धा तास म्हणजे काहीच नाही. सलग ३२ तास काम करते ती. या सगळ्या काळात ती जवळ जवळ २०० किलोमीटरचा प्रवास करते आणि ७० किलोचा माल वाहून आणते. ३२ तासांच्या या कामानंतर तिच्या हाती ४०० रुपये पडतात.









