“शेतांमधला गाळ आणि बाकी राडा सुकत चाललाय, त्यामुळे उडणारी बारीक धूळ फार त्रासदायक आहे,” पट्टणमथिट्टामध्ये दातन सी एस सांगतात. “प्लीज, हा वापरा,” शल्यचिकित्सक वापरतात तसला एक मास्क त्यांनी मला दिला, हे पाहून एका ताईला हसू यायला लागलं – केरळच्या पुरात जिच्या शेताचं निकसान झालं होतं त्यातली ही एक. “अहो, मुंबईत राहतात ते,” ती शेरा मारते, “यांना प्रदूषणापासनं काय जपायचंय?”
ही शेतं म्हणजे विध्वसांची चित्रं आहेत. कधी काळी नफा मिळवून देणारी भाताची आणि आरारोटची सुंदर शेती सध्या नदीपात्रातून वाहून आलेल्या काही इंच – काही ठिकाणी तर काही फूट – गाळाच्या थराखाली लपून गेलीये. उंचावरून वाहत आलेल्या पाण्याच्या लोंढ्यांसोबत गाळाबरोबर कारखान्यांचं सांडपाणी आणि प्रदूषणकारी घटकही जमा झाले आहेत. अनेक एकर शेतजमिनींवर हा जीवघेणा गाळ आता कडक उन्हात वाळून घट्ट झालाय आणि सगळ्या मातीवर जणू काही कच्च्या सिमेंटचा थर दिल्याचं चित्र आहे.
पाण्याची पातळी कमी व्हायला लागलीये, पाणी जमिनीत मुरायचंच थांबलंय, विहिरी कोरड्या पडू लागल्यायत आणि हवा तापायला लागलीये. या सगळ्यामुळे भूजल आणि भूस्तराचं सगळं समीकरणच बिघडून गेलंय. नद्यांच्या परिस्थितिकीत लक्षणीय बदल घडून आलेत. गाळ आणि वाळूचे किनारे वाहून गेल्यामुळे अनेक नद्या आणि ओढ्यांमध्ये आता पाणी थोपवून ठेवण्याची क्षमताच राहिलेली नाही. आणि त्यामुळेच, विचार करायला कितीही विचित्र वाटत असलं तरी आता केरळमधली यानंतरची आपत्ती ही दुष्काळ असू शकते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा आपली शेती रुळावर आणणं अगदी खूप धीराच्या माणसालाही भोवंडून टाकू शकतं.
पण कुटुंबश्रीच्या महिला शेतकऱ्यांना मात्र नाही.
या तब्बल अडीच लाखाहून जास्त महिला आहेत, केरळमधल्या गाव-वस्ती पातळीवरच्या महिलांच्या प्रचंड मोठ्या जाळ्याचा एक अंश. कुटुंबश्री (शब्दशः, कुटुंबाची समृद्धी) मध्ये ४५ लाख स्त्रिया आहेत. सर्व सज्ञान महिलांना याचं सभासद होता येतं, एका कुटुंबातून एक महिला एवढीच मर्यादा घालण्यात आली आहे. थोडक्यात काय तर केरळच्या ७७ लाख कुटुंबांपैकी ६० टक्के घरांमधून एक तरी सभासद या जाळ्यामध्ये आहे. कुटुंबश्रीच्या गाभ्याशी आहेत या ३.२ लाख स्त्रिया ज्यांनी स्वतःला संघ कृषीशी जोडून घेतलंय – हे सामूहिक शेती करणारे गट आहेत.







