या लेखातल्या सरकारी अधिकारी वगळता सर्वांची नावं बदलण्यात आलेली आहेत जेणेकरून त्यांची ओळख उघड होणार नाही. त्यामुळेच गावांची नावंही देण्यात आलेली नाहीत. दोन लेखांच्या मालिकेतला हा दुसरा लेख आहे.
“कीडा जडीमुळे आमचं आयुष्यच बदलून गेलंय,” आमची टॅक्सी चालवता चालवता सुनील सिंग म्हणतो. हा २३ वर्षांचा तरूण गेल्या दोन वर्षांपासून ही गाडी चालवतोय, आसपासच्या गावातल्या लोकांना धारचुलाला पोचवतोय, शाळेत, कॉलेजला, बाजारात किंवा दवाखान्यात. उत्तराखंडच्या पिथोरागढ जिल्ह्यातला धारचुला हा तालुका भारत-नेपाळ सीमेपासून अगदी काही मीटरवर आहे.
कीडा जडी विकून जे ३.५ लाख रुपये साठवले होते त्यातून सुनीलने ही बोलेरो गाडी घेतली, जोडीला बँकेचं कर्ज काढलं. तो आठ वर्षांचा असल्यापासून त्याच्या घरच्यांबरोबर ही बुरशी गोळा करायला जातोय आणि आता त्या कमाईतून कर्जाची परतफेड करतोय.
कॅटरपिलर किंवा अळी बुरशी ३,५०० ते ५,००० मीटर उंचीवरच्या तिबेटन पठारी प्रदेशातल्या पर्वतीय कुरणांमध्ये वाढते. ‘हिमालन व्हायग्रा’ नावाने ओळखली जाणारी ही बुरशी कामोत्तेजक मानली जाते. चीनमध्ये तिला यारसागुम्बा म्हणतात आणि पारंपरिक चिनी औषधांमधला तो मोलाचा घटक आहे. सीमेपार चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यामध्ये उत्तम प्रतीच्या एक किलो कीडा जडीला अगदी १२ लाखांपर्यंत किंमत मिळू शकते. उत्तराखंडमध्ये गोळा करण्यात येणारी बहुतेक सगळी बुरशी नेपाळ आणि चीनच्या दलालांमार्फत तस्करीतून विकली जाते.
उत्तराखंडच्या पिथोरागढ आणि चमोली या दोन उंचावरच्या जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीला कीडा जडीचा हंगाम सुरू होतो आणि जूनच्या मध्यावर किंवा जून संपता संपता, मोसमी पाऊस येईपर्यंत चालतो. अख्खी कुटुंबंच्या कुटुंबं कुरणांमध्ये तंबू थाटतात आणि ही बुरशी गोळा करण्याचं कष्टाचं आणि वेळखाऊ काम करतात. (पहा, कीडा जडीने केला पिथोरागढच्या कुटुंबांचा कायापालट)







