पावागाडातलं ते अगदी रमणीय दृश्य होतं. पहिल्या दृष्टीक्षेपात तर नक्कीच. कर्नाटकातच्या तुमकूर जिल्ह्यातल्या या गावातल्या रस्त्यावरची बोगनवेल, रंगीबेरंगी घरं, कोरीव काम केलेली मंदिरं आणि रस्त्याने पायी जाणाऱ्यांच्या कानी येणारे मंदिरांमधले नादघोष. अगदी सुंदर म्हणावं असं पण वास्तव काही वेगळंच आहे. कारण तिथे आम्ही मात्र बोलत होतो, मैल्याविषयी.
इंग्रजीत हा शब्द लिहिताना मध्यमवर्गीयांच्या भावनांचं भान ठेवून फुल्या फुल्यांचा वापर करावा लागतो. रामांजनप्पांच्या नशिबी मात्र ते सौजन्य नाही. “मी माझ्या उघड्या हाताने विष्ठा साफ करतो,” पावागाडा तालुक्याच्या कन्नमेडी गावचे सफाई कर्मचारी असणारे रामांजनप्पा सांगतात. आणि हे कमी की काय, हे अमानुष काम जरा तरी सुसह्य करू शकणारी एकमेव गोष्ट त्यांच्या इथे गायब आहेः रामांजनप्पांना ऑक्टोबर २०१७ नंतर पगार मिळालेला नाही.
या गावाच्या भिंती कचरा वर्गीकरणाच्या चित्रांनी सजल्या आहेत, आणि चांगलंच आहे ते. पण हा सगळा सरकारच्या सहाय्याने उभा करण्यात आलेला देखावा आहे हे आम्हाला २० सफाई कामगारांशी बोलताना कळलं. हाताने मैला साफ करणारे हे सगळे जण माडिगा या दलित जातीतले आहेत. भित्तीचित्रांनी सजलेल्या टाउन हॉलपासून १० मीटरवरच असणाऱ्या आंबेडकर भवनमध्ये जमलेले हे सारे जण त्यांच्या दैन्याबद्दल बोलत होते.
रामांजनप्पांना दर महिन्याला मिळणाऱ्या रु. ३,४०० या पगारात घरच्यांचं – पत्नी आणि तीन शाळेत जाणाऱ्या मुलांचं – पोट कसबसं भरतं. मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही.
काही जणांना पगार मिळालेला नाही तर काहींना कबूल करण्यात आलेली पगारवाढ देण्यात आलेली नाही.












