छत्तीसगढ मधील आदिवासी जमातींचं संगीत हे मुक्तीचं संगीत आहे - अनेक दशके हिंसक संघर्षात पोळून निघालेल्या लोकांचं. बहुदा ढोलावर ताल धरलेल्या त्यांच्या गाण्यांत त्यांच्या जमिनीच्या सौंदर्याचं, त्यांच्या जंगलाचं, त्यांच्या रोजच्या जगण्याचं वर्णन आणि निसर्गाप्रति आदर आढळून येतो. लहान मुलांना देखील त्यांच्या कुटुंबात लहानपणी ही गाणी शिकवली जातात.
आम्ही ऑगस्ट २०१६ मध्ये छत्तीसगढच्या दक्षिण टोकाशी असलेल्या बिजापूर जिल्ह्यातील भैरमगढ तालुक्यात असलेल्या फारसेगढ गावाला भेट दिली होती. (२०११ च्या जनगणनेनुसार) बिजापूरच्या सुमारे २,२५,००० लोकसंख्येपैकी ८० टक्के अनुसूचित जमातीचे आहेत. फारसेगढ मधील १,४०० रहिवाशीआणि जवळील काही गावांमधील बहुतेक लोक मुरिया गोंड जमातीचे आहेत. हे गाव नक्षलवादी, शासन आणि शासनप्रणीत सलवा जुडूम यांतील संघर्षाने ग्रस्त असलेल्या गावांपैकी एक आहे. गावकरी म्हणतात ते कायम हिंसेच्या चक्रात अडकून असतात.
या संघर्षात आपला नवरा गमावलेली एक महिला विचारते, "एक मुलगा नक्षल अन् दुसरा पोलिसांचा पाठीराखा निघाल्यावर आणखी काय होणार? सगळे एकमेकांच्या जिवावर उठले असताना कुटुंबाने काय करावं? हेच आमच्या जगण्याचं वास्तव आहे." त्या पन्नाशीत असलेल्या शेतकरी आहेत. त्यांना आपलं नाव सांगायचं नव्हतं. "आम्ही फार कमावत नाही. आम्ही उद्या जगणार की नाही, हे पण आम्हाला ठाऊक नसतं. आम्ही आज जिवंत आहोत, आणि आम्ही एवढाच विचार करतो."
फारसेगढ पर्यंत फार सरकारी योजना पोहोचत नाहीत – एक निवासी शाळा, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सी. आर. पी. एफ.) तळ एवढीच काय ती शासनाची निशाणी.








