२२ जून रोजी दिलीप यांनी कामावर निघताना नेहमीप्रमाणे आपली पत्नी मंगल आणि मुलगी रोशनीचा हात हलवून निरोप घेतला. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी त्या दोघींना पाहिलं, ते एका स्थानिक रुग्णालयात पांढऱ्या कापडात गुंडाळलेलं.
"त्या दिवशी राती घरी आलो, तर दोघीही नव्हत्या," ते म्हणाले. ते महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील कडव्याचीमाळी या आदिवासी पाड्यातील आपल्या झोपडीत मिणमिणत्या उजेडात बसले होते.
त्या हरवल्या आहेत या विचाराने दिलीप यांनी ३० वर्षीय मंगल आणि तीन वर्षांच्या रोशनीला गावभर शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी आपली थोरली मुलगी नंदिनी, वय ७, हिला त्यांना पाहिलं का तेही विचारलं. "पण तिला काहीच ठाऊक नव्हतं," ३५ वर्षांचे दिलीप म्हणाले. "रात सरली तरी त्या परतल्या नाही, तेंव्हा मी घाबरलो."
दुसऱ्या दिवशी सकाळी दिलीप यांनी कासावीस होऊन आपल्या वस्तीच्याही पलीकडे जाऊन शोधमोहीम सुरू केली. आसपासच्या काही पाड्यांमध्ये ते पायी चालत गेले, पण त्यांचा पत्ता लागला नाही. "दुपारी मंगलच्या मावशीला भेटून आलो, तिला काही ठाऊक आहे का ते पाहायला," दिलीप म्हणाले. ते मातीच्या ओलसर भिंतीला टेकून बसले होते. शेजारी भांडी मांडून ठेवलेली होती. "तिलाही काही अंदाज नाय."
त्या रात्री कातकरी आदिवासी असणारे दिलीप, घरी परत आले, पण मंगल आणि रोशनी यांचा अजूनही पत्ता नव्हता. तिथे फक्त नंदिनी होती. पुढील सकाळी, २४ जून रोजी, त्यांचा ठावठिकाणा लागेल या आशेने त्यांनी नव्या जोमाने आपली शोधमोहीम सुरू केली. आणि तसंच झालं. मात्र, त्या अशा ठिकाणी सापडणं त्यांना अपेक्षित नव्हतं.
जव्हार तालुक्यातील देहारे या महसुली गावात असलेल्या कवड्याचीमाळी येथून साधारण चार किलोमीटर दूर जंगलात एक महिला आणि एक चिमुकली मृतावस्थेत आढळून आल्या. व्हॉट्सॲपवर त्यांचे फोटो फिरू लागले होते. दिलीप यांना आपल्या गावाच्या वेशीजवळ भेटलेल्या एका मुलाच्या फोनमध्ये ते फोटो होते. "त्यानं मला ते फोटो दाखवले, तेंव्हा मी म्हटलं ही माझीच बायको अन् मुलगी आहे," दिलीप यांनी सांगितलं.








