“ही रात्र लवकर सरावी अशीच मी प्रार्थना करत असते. गावात आता जवळपास कुणीच राहत नाही, त्यामुळे सगळीकडे नुसते साप वळवळत असतात,” कवला श्रीदेवी सांगते. ती आणि तिच्या घरचे किर्र काळोखात कशी बशी रात्र काढतात कारण शासनाने मे २०१६ पासून त्यांची वीज जोडणी खंडित केली आहे.
गोदावरीच्या तीरावर असणाऱ्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या पोलावरम मंडलातल्या पायडिपाका गावातली मोजकी दहाच घरं आता मागे राहिली आहेत, त्यातली एक श्रीदेवी. सरकारने सिंचन प्रकल्पासाठी जमिनी संपादित केल्यानंतर ४२९ कुटुंबांना इथून बळजबरी हटवण्यात आलं होतं. जलयग्नम नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रचंड मोठ्या योजनेचा भाग असणाऱ्या या प्रकल्पाचं उद्घाटन २००४ साली करण्यात आलं आणि २०१८ पर्यंत तो पूर्ण होणं अपेक्षित होतं. सध्या मात्र केवळ ६० टक्के इतकंच काम पूर्ण करण्यात आलं आहे.
“आधी वीज तोडली, त्यानंतर त्यांनी पाण्याचा पुरवठादेखील बंद केला,” श्रीदेवी सांगते. आपले पती सूर्यचंद्रन यांच्या रिक्षातून आठ किलोमीटरवरच्या पोलावरम शहरातून २० रुपयाला २० लिटर पाण्याचा कॅन तिला आणावा लागतोय.
काही काळापुरतं हे नवरा बायको आणि त्यांची तीन मुलं देखील (लेखाच्या सुरुवातीचे छायाचित्र पहा) गोपालपुरम मंडलातल्या हुकुमपेटा इथल्या पुनर्वसन कॉलनीत रहायला गेले. त्यांच्याप्रमाणेच इतरही अनेक कुटुंबं तिथे गेली. मात्र एका महिन्यातच ते पायडिपाकाला परतले. “आधी आम्ही अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवला, मात्र शासन त्याच्या शब्दाला जागणार नाही हे आमच्या ध्यानात आलं आणि आम्ही परतलो,” डोळ्यातलं पाणी परतवण्याचा प्रयत्न करत श्रीदेवी सांगते.









