त्शेरिंग दोरजी भुटिया यांचं आयुष्य या कारागिरीत इतकं गुंतलंय की त्यांचा उदरनिर्वाह धनुष्यबाण बनवून चाललाच नाहीये हे जरा वेळाने लक्षात येतं. हा अनोखा प्रवास सांगू पाहतोय ८३ वर्षांचा एक म्हातारबाबा, पाकयॉन्ग जिल्ह्यातील कार्थोक गावात आपल्या घरी! मागच्या ६० वर्षांपासून, त्यांचं उत्पन्न सुतारकामातून आलं आहे – तेही मुख्यतः फर्निचरच्या दुरुस्तीतून. पण त्यांच्यातील ही प्रेरणा मात्र तिरंदाजीतून आली जी अगदी खोलवर रुजलीये त्यांच्या मूळच्या सिक्कीमी संस्कृतीत! आणि याविषयी त्शेरिंग तुम्हाला पुढं सांगतीलच.
अनेक दशकं एक कुशल सुतार म्हणून काम केलं तरी त्याचा कुठे दर्प नाही. आपली ओळख ‘पाकयॉन्गचा धनुष्य बनवणारा’ म्हणूनच असावी ही त्यांची प्रामाणिक इच्छा.
“मी १०-१२ वर्षांचा होतो, तेव्हापासून मी लाकडाच्या वस्तू बनवायला सुरुवात केली. हळूहळू धनुष्य आकार घेऊ लागलं. लोकांनी ते विकत घ्यायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे हा तिरंदाज जन्माला आला,” त्शेरिंग ‘पारी’ सोबत गप्पा मारत सांगतात.
आम्हाला त्यांची काही उत्पादनं दाखवत ते सांगू लागतात, “सुरुवातीला, धनुष्य वेगळ्या पद्धतीने बनवलं जात होतं. ह्या पूर्वीच्या प्रकाराला तब्जू (नेपाळीमध्ये) म्हटलं जायचं. त्यात एकमेकांना जोडलेले, बांधलेले आणि चामड्याने झाकलेले काठीचे दोन साधे नग होते. आजकाल आम्ही जो प्रकार बनवतो, त्याला ‘बोट डिझाइन’ म्हणतात. एक धनुष्य बनवायला किमान तीन दिवस तरी लागतात. तेही तुमचे हात तरुण आणि कार्यक्षम असले तर. वयस्कर, म्हाताऱ्या हातांना थोडे दिवस जास्त,” त्शेरिंग मिश्किलपणे हसत सांगतात.














