चंपत नारायण जंगलेंनी प्राण सोडला तेच हे शेत. माळाकडचं, खडकाळ, ओसाड.
महाराष्ट्राच्या या पट्ट्यात अशा जमिनीला हलकी जमीन म्हणतात. मागे हिरवाईने नटलेले डोंगर आणि गावापासून दूर असलेली, एका कडेची ही जमीन आंध आदिवासींची आहे.
खडकाळ शेतात चंपत यांची खोप अजूनही तशीच उभी आहे. उन्हा-पावसापासून संरक्षण म्हणून बांधलेल्या या खोपीत दिवस रात्र जागल करून रानडुकरांपासून पिकं वाचवायला चंपत इथेच रहायचे. त्याच्या आसपासच्यांना विचारलं तर ते सांगतात की कधीही बघा चंपत शेत राखत इथेच असायचे.
आपल्या खोपीत बसून आंध आदिवासी असलेल्या, चाळिशी पार केलेल्या चंपत यांना एका नजरेत आपलं शेत दिसत असेल. आणि फक्त शेतच नाही तर सततचं नुकसान, कापूस न लागलेली खुरटी रोपं आणि गुडघ्यापर्यंत वाढलेली तूरही.
शेताकडे पाहूनच त्यांना कळून चुकलं असणार की दोन महिन्यात पिकं कापणीला येतील तेव्हा त्यांच्या शेतात काहीही पिकलेलं नसणार. त्यांच्या डोक्यावर कर्ज होतं, रोजचा घरखर्च भागवायचा होता. आणि हाती पैसा नाही.
















