“हे पांढरे स्वच्छ दाणे बघताय?” तळ हातातावरील सोयाबीन दाखवत अशोक गाटकळ विचारतायत. “बाजारात याला ३००० ते ३५०० रुपये प्रती क्विंटल इतकी किंमत येती. पन यंदा जास्त माल तर डागाळलेला आन् बुरशी लागलेलाच हाय,” दुसऱ्या तळहातावरचं खराब झालेलं सोयाबीन दाखवत ते पुढे म्हणतात. “या असल्या मालाला काय बाजार नाय. कायीक कमाई नाय व्हायची यातून.”
११ नोव्हेंबरला रथगल्लीतल्या त्यांच्या शेतात गेल्यावर गाटकळ खराब झालेलं पीक कोयत्यानं सपासप कापत होते. ते एकटेच राबत होते. “मजुरी द्यायला कसं परवडायचं?” कपाळ आणि नाकावरून टपाटपा गळणारा घाम ते पुसून टाकत ते विचारतात.
ऑक्टोबर महिन्यात जवळजवळ दोन आठवडे गाटकळ यांच्या तीन एकरातली पिकं पाण्याखाली होती. अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातलं जवळपास ९० टक्के सोयाबीन सडून गेलंय. नाशिक जिल्ह्यात १ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरच्या दरम्यान १७३.२ मिमी इतका पाऊस कोसळला. त्यांचं गाव याच नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यात आहे. (भारतीय हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार) एरवी या कालावधीत ७१ मिमी इतका पाऊस पडतो.
रथगल्लीत पावसाळ्याच्या सुरूवातीला जूनमध्ये पाऊस कमी होता मात्र सप्टेंबरच्या अखेरपर्यंत त्याने बराच जोर धरला, यामुळे ५१ वर्षांच्या अशोक गाटकळ यांना चांगलं पीक होईल अशी आशा होती. पण अचानक पडललेल्या पावसामुळे ते पूर्णच खचून गेले. ऑक्टोबरच्या अखेरीस, तलाठी कार्यालयात त्यांनी त्यांचा पीकनुकसानीची माहिती दिली, मात्र दोन आठवडे पालटले तरी अद्याप पाहणीसाठी कोणीही फिरकले नाही.










