हॅसलब्लॅड पुरस्कार विजेती छायाचित्रकार दयनिता सिंग यांनी पारीच्या सहयोगाने दयनिता सिंग-पारी बोधपट-छायाचित्रण पुरस्कार सुरू केला आहे

दोन लाख रुपयांचा पहिला दयनिता सिंग-पारी बोधपट-छायाचित्रण पुरस्कार पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया-पारीच्या एम. पलानी कुमार याला जाहीर झाला आहे.

दयनिता यांना २०२२ सालासाठीचा विख्यात हॅसलब्लॅड पुरस्कार जाहीर झाला आणि त्यातूनच या पुरस्काराची कल्पना पुढे आली. छायाचित्रण जगतात हा सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो. दयनिता यांनी स्वतः असं सांगितलं की पलानी कुमार या स्वयंभू छायाचित्रकाराच्या कामाचा उद्देश, तो टिपतो त्या गोष्टी, त्याच्या कामाचा आत्मा आणि दस्तावेजीकरणातलं त्याचं अप्रतिम कौशल्य या गोष्टींचं त्यांना अप्रूप वाटतं.

त्यांनी हा पुरस्कार पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया-पारीच्या सहयोगाने द्यावा असं ठरवलं. कारण त्यांच्या मते बोधपट, दस्तावेजीकरणाच्या अंगाने छायाचित्रण करणाऱ्या मोजक्या मंचांपैकी पारी एक आहे आणि पारीच्या कामाचा भर वंचितांच्या जीवनाचा, जीविकांचा वेध घेणं हा आहे.

पलानी कुमार हा पारीसाठी पूर्णवेळ छायाचित्रण करणारा पहिलाच. तसं पाहता आमच्यासाठी ६०० हून अधिक जणांनी छायाचित्रण केलं आहे. पारीवर प्रकाशित झालेलं त्याचं काम अशा लोकांसंबंधी आहे ज्यांचा आपण फारसा विचारही करत नाही. स्वच्छता कर्मचारी, सुंद्री शैवाल गोळा करणाऱ्या बाया, शेतमजूर आणि अशाच कित्येकांचं आयुष्य आणि काम पलानी टिपतो. त्याच्या कामातलं कौशल्य आणि सामाजिक भान, त्या मागची समानुभूती या क्षेत्रातल्या अगदी मोजक्या लोकांपाशी आहे.

PHOTO • M. Palani Kumar

तमिळ नाडूच्या थूथुकुडीमधल्या २५,००० एकर क्षेत्रातल्या मिठागरांमध्ये तुटपुंज्या मोबदल्यावर घाम गाळणाऱ्या अनेक महिला कामगारांपैकी एक म्हणजे राणी. संदर्भः थूथुकुडीच्या मिठागरांची राणी

PHOTO • M. Palani Kumar

ए. मूकुपोरी आठ वर्षांच्या असल्यापासून समुद्रात सूर मारत समुद्री शैवाल गोळा करतायत. तमिळ नाडूच्या भारतीनगरमधे राहणाऱ्या अनेक मच्छीमार स्त्रिया पूर्वापारपासून हे अनोखं काम करतायत. पण वातावरण बदलांमुळे त्यांची उपजीविका धोक्यात आली आहे. संदर्भः तमिळ नाडूच्या समुद्री शेवाळ संग्राहक खोल गर्तेत

PHOTO • M. Palani Kumar

सत्तरी पार केलेल्या गोविंदम्मा बकिंगहॅम कालव्याच्या पाण्यात कोळंबी पकडतायत आणि आपल्या तोंडात पकडलेल्या वेताच्या पिशवीत जमा करतायत. हाताला जखमा झाल्या आहेत, नजर अधू झालीये तरीही घर चालवण्यासाठी त्या हे काम करतायत. संदर्भः ‘अख्खं आयुष्य पाण्यात’ काढणाऱ्या गोविंदम्मा

PHOTO • M. Palani Kumar

तमिळ नाडूच्या करूर जिल्ह्यातल्या कावेरी नदीच्या किनाऱ्यावरच्या कोराईच्या रानात ए. मरियायींसारख्या अनेक बाया काम करतात. काम अतिशय कष्टाचं, पैसा कमी आणि आरोग्यावर विपरित परिणाम होतो. संदर्भः ‘हे कोराईचं रान आमचं दुसरं घर असल्यागत आहेत’

PHOTO • M. Palani Kumar

आपल्या रोजच्या खाण्याचा अविभाज्य भाग असणारं मीठ जिथे बनतं त्या मिठागरात उन्हाच्या तलखीत काम करणारा एक कामगार. तमिळ नाडूच्या थूथुकुडीमध्ये मिठागरांमध्ये काम करताना सुरक्षेचा फारसा विचार केला जात नाही. संदर्भः थूथुकुडीच्या मिठागरांची राणी

PHOTO • M. Palani Kumar

पी. मागराजन हे तमिळ नाडूच्या मोजक्या कोम्बू कलाकारांपैकी एक आहेत. हत्तीच्या सोंडेच्या आकाराचं हे स्वरवाद्य वाजवण्याची कला आता अस्ताला गेल्यात जमा आहे. कलाकारांच्या हाताला कामही नाही आणि दामही. संदर्भः मदुराईत कोम्बुचे क्षीण स्वर

PHOTO • M. Palani Kumar

कोविड-१९ च्या टाळेबंदीदरम्यान चेन्नईतले स्वच्छता कर्मचारी लांब लांब अंतर पायी जात होते. कुठल्याही संरक्षक साहित्याशिवाय रस्ते झाडत होते, शहर साफ करत होते आणि एकही दिवसाची सुट्टी न घेता. संदर्भः सफाई कामगार – कृतघ्नतेचे मानकरी

PHOTO • M. Palani Kumar

अपंगत्व असणाऱ्या रिटा अक्का चेन्नईच्या कोट्टुरपुरम परिसरात सकाळच्या वेळी कचरा उचलतात. संध्याकाळ मात्र त्यांचे सवंगडी असणाऱ्या कुत्र्यांना खाऊ घालण्यात जाते. संदर्भः रिटा अक्कांचं आयुष्य कुत्र्या-मांजरांच्या तोंडी

PHOTO • M. Palani Kumar

डी. मुथुराजा आपला मुलगा विशांत राजासोबत. मुथुराजा आणि त्यांची पत्नी एम. चित्रा गरिबी, आजारपणं आणि अपंगत्वाचा सामना करत आशा न सोडता धैर्याने आयुष्याला सामोरे जात आहेत. संदर्भः चित्रा आणि मुथुराजाची आगळी प्रेम कहाणी

PHOTO • M. Palani Kumar

आर. येळिलरासन एक कलाकार आहेत. आपली कला, कारागिरी, नाटकं आणि अभिनयातून त्यांनी तमिळ नाडूच्या अगणित मुलांचं आयुष्य उजळून टाकलंय आणि त्यांच्या चेहऱ्यांवर हसू आणलंय. संदर्भः येळिल अण्णांनी मला मातीतून घडवलंय

PHOTO • M. Palani Kumar

पलानीची आई, तिरुमयी तोंडभरून हसतीये तो दुर्मिळ क्षण. संदर्भः माझ्या आईचं आयुष्य – दिव्याच्या खांबाखाली उजळलेलं

पी. साईनाथ पीपल्स अर्काईव्ह ऑफ रुरल इंडिया - पारीचे संस्थापक संपादक आहेत. गेली अनेक दशकं त्यांनी ग्रामीण वार्ताहर म्हणून काम केलं आहे. 'एव्हरीबडी लव्ज अ गुड ड्राउट' (दुष्काळ आवडे सर्वांना) आणि 'द लास्ट हीरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियन फ्रीडम' (अखेरचे शिलेदार: भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ) ही दोन लोकप्रिय पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

यांचे इतर लिखाण साइनाथ पी.
Translator : Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.

यांचे इतर लिखाण मेधा काळे