एक उमदा तरूण त्याच्याहून मोठ्या पैलवानाशी कुस्ती खेळतोय. तरूण जिंकतो आणि त्याचा अनुभवी प्रतिस्पर्धी हार पत्करतो. असं करणारा हा आहे तरुण पोराचा प्रेमळ मामा. पुणे जिल्ह्याच्या नांदगावच्या शाहू कांबळेंनी गायलेल्या सहा ओव्यांमधल्या पहिली ओवी अशी सुरू होते.
दुसऱ्या ओवीत त्या गातात, कुस्त्या माळावर चालू आहेत. तरण्या पोराची आई तिच्या भावाला सांगते, “तुझ्या बहिणीचा पोर आहे, जरा जपून.” तिसऱ्या ओवीत कुस्ती खिंडीत चालू आहे. पण पाहणाऱ्या मैत्रिणी म्हणतात, “काळजी करू नका, कारण मामा भाचे दोघं खेळात वस्ताद आहेत, माय अन् लेकीची पोरं आहेत.”
चौथ्या ओवीमध्ये कुस्ती चालू असताना पैलवानांच्या नावाने हलगी टांग टांग वाजतीये आणि पाहणारे कौतुकाने विचारतायत, “हा पैलवान कोण्या माईचा आहे ते सांग.” पैलवानाचा बाप कोण असं काही या ओवीत विचारलेलं नाही ही बाब खरंच मजेशीर आहे. कारण पैलवानाची ताकद, आडदांड शरीर आणि कुस्तीतलं कौशल्य या सगळ्याचं श्रेय त्याच्या आईला दिलेलं आहे. तिनंच त्याला जन्म दिलाय त्याला लहानाचं मोठं केलंय.
शेवटच्या ओवीत शाहूबाई गातात, शिवेकडच्या शेतामध्ये कोण गाणं गातोय. हा तर मामा, त्याच्या भाच्याला शिकवितोय.



