“आंदोलनाने मला शिकवलं की पुढे कसं जायचं आणि आपली लढाई
कशी लढायची. आम्हाला आता मान मिळालाय.” यातल्या 'आम्ही' म्हणजे सप्टेंबर २०२० मध्ये
पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात लढा पुकारलेल्या ४९ वर्षीय राजिंदर कौर यांच्यासारख्या
असंख्य महिला. पंजाबच्या पतियाळा जिल्ह्यातल्या राजिंदर २२० किलोमीटर अंतर पार
करून किती तरी वेळा सिंघु सीमेवर गेल्या आणि तिथे त्यांनी भाषणंही केली.
दौन कलां या त्यांच्या गावी शेजारीच राहणाऱ्या ५० वर्षीय हरजीत कौर २०५ दिवस दिल्ली-हरयाणा सीमेवरच्या सिंघुमध्ये राहिल्या. “पोटासाठी मी काही पिकवलं नाही असं कधी म्हणजे कधीही झालं नाहीये. एकेक पीक घेत हे केस पांढरे झालेत,” गेली ३६ वर्षं शेती करत असलेल्या हरजीत म्हणतात. “पण अशा प्रकारचं आंदोलन मी पहिल्यांदाच पाहिलं आणि त्यात भाग घेण्याची वेळही पहिलीच,” त्या सांगतात. “लहान लहान मुलं आणि म्हाताऱ्या बाया आंदोलनासाठी येत होत्या तेही पाहिलं.”
केंद्रातील सरकारने वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावेत ही मागणी घेऊन दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी गोळा झाले होते. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातल्या बहुसंख्य शेतकऱ्यांनी नोव्हेंबर २०२० पासून तिथे तळच ठोकला होता, तो थेट नोव्हेंबर २०२१ मध्ये कायदे रद्द केले, तोपर्यंत. हे शेतकरी आंदोलन ऐतिहासिक ठरलंच पण अलिकडच्या काळात झालेल्या जनआंदोलनांपैकी कदाचित सर्वात मोठंही.
पंजाबातल्या असंख्य स्त्रिया आंदोलनाच्या अगदी अग्रस्थानी होत्या. तिथे जाणवेलली एकजूट आजही तशीच असल्याचं त्या सांगतात. आणि आंदोलनात सहभाग घेतल्याने हाती लागलेलं धाडस आणि स्वातंत्र्याची भावना बळकट झाली असल्याचं त्यांना वाटतं. “मी तिथे [आंदोलनस्थळी] होते ना, मला घराची आठवणही यायची नाही. आता आंदोलनाचीच सतत याद येते,” मन्सा जिल्ह्याच्या ५८ वर्षीय कुलदीप कौर सांगतात.
आधी कसं बुलधाला तहसिलातल्या आपल्या राली गावी घरकामाच्या बोज्यामुळे त्यांचं मन कशात लागायचंच नाही. “इथे एका पाठोपाठ एक कामाचा रगाडा सुरुच असतो. किंवा घरी पाहुणे येतात, मग त्यांच्यासमोर सगळं आवरून सावरून करावं लागतं. तिथे कशी मी मनमुक्त होते,” कुलदीप सांगतात. आंदोलनस्थळी त्या लंगरमध्ये सेवा करायच्या. गरज पडली तर आयुष्यभर तिथेच काम करायला त्या तयार आहेत. “म्हातारी कोतारी पाहिली ना की वाटायचं मी माझ्या आई-वडलांसाठीच स्वयंपाक करतीये.”
सुरुवातीला जेव्हा शेतकऱ्यांनी निदर्शनं करायला
सुरुवात केली तेव्हा कुलदीप कोणत्याच संघटनेत सामील झाल्या नव्हत्या. नंतर संयुक्त किसान मोर्चा गठित झाला तेव्हा त्यांनी एक पोस्टर तयार
केलं होतं. आणि त्याच्यावर घोषवाक्य होतं – ‘किसान मोर्चा झिंदाबाद’, तेच पोस्टर
घेऊन त्या सिंघुला गेल्या होत्या. तिथे आंदोलनस्थळी असलेल्या बायांनी त्यांना 'येऊ
नको' असं सांगितलं होतं. जिथे तळ ठोकला होता तिथे अनेक अडचणी होत्या. पण कुलदीप
यांचा निर्धार पक्का होता. “मी त्यांना सांगितलं, ‘मी येणार म्हणजे येणार’.”
सिंघुला त्या पोचल्या तेव्हा मोठ्या चुलींवर बाया रोट्या करत होत्या. “त्यांनी दुरूनच मला आवाज दिला, ‘ताई, जरा मदत कर बाई, ये, रोट्या करू लाग’.” टिक्रीलाही तेच घडलं. तिथे त्यांना मन्साहून आलेली एक ट्रॅक्टर ट्रॉली दिसली आणि त्यांनी तिथेच आपली पथारी टाकली. तिथे चुलीजवळ बसलेली एक ताई खूपच थकून गेली होती. तिने कुलदीपला मदत मागितली. “मी तासभर रोट्या करत होते,” कुलदीप सांगतात. टिक्रीहून त्यांची रवानगी हरयाणा-राजस्थान सीमेवर असलेल्या शहाजहाँनपूरला करण्यात आली. “तिथे काही काम सुरू होतं आणि तिथल्या गडीमाणसांनी मला त्यांच्यासाठी रोट्या करायला सांगितलं,” त्या सांगतात. आणि मग हसत हसत म्हणतात, “कुठेही जा, तेवढंच काम सांगायचे लोक. माझ्या कपाळावर लिहिलंय की काय की 'मी रोट्या करते!'”
तिथे गावी कुलदीपची शेतकरी आंदोलनाप्रती असलेली निष्ठा इतरांना प्रेरणा देत होती. त्यांच्या मैत्रिणी आणि शेजारीपाजारी 'आम्हालाही तुझ्याबरोबर घेऊन चल' असं म्हणायचे. “मी समाजमाध्यमांवर फोटो टाकायचे, ते त्या पहायच्या. पुढच्या वेळी आम्हालाही यायचंय म्हणायच्या.” मी जर आंदोलनात भाग घेतला नाही तर आपली नातवंडं आपल्याला काय म्हणतील याची चिंता वाटत असल्याचं एक मैत्रीण म्हणाली होती.
टीव्हीवरच्या मालिका किंवा चित्रपट कुलदीप कधीच पहायच्या नाहीत. पण अधून मधून घरी आल्यावर तिकडच्या बातम्यांसाठी त्या टीव्ही पहायला लागल्या. “मी थेट आंदोलनात सहभागी असायचे किंवा मग त्याच्या बातम्या पाहत असायचे,” त्या सांगतात. परिस्थिती इतकी अनिश्चित होती की त्याचा त्यांना त्रास व्हायचा. चिंता कमी व्हावी यासाठी त्यांना औषधं द्यावी लागली होती. “माझ्या डोक्याला मुंग्या यायच्या,” त्या सांगतात. “डॉक्टरांनी मला बातम्या पाहणं बंद करा असं सांगितलं शेवटी.”
शेतकरी आंदोलनात सामील झाल्यावरच कुलदीप यांना आपल्या आत दडलेलं पण कधीच न समजलेलं धाडस लक्षात आलं. कार किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीने प्रवास करण्याची भीती वाटायची त्यावर त्यांनी मात केली. आणि दिल्लीच्या अनेक वाऱ्या केल्या, शेकडो किलोमीटर प्रवास केला. “किती तरी शेतकरी अपघातात मेले. मग मला वाटू लागायचं की मी पण अशीच मरून गेले तर आमचा विजय झालेला पहायलाच मिळणार नाही,” त्या सांगतात.
घरी परतल्यावर कुलदीप त्यांच्या स्वतःच्या गावात जी निदर्शनं व्हायची त्यात भाग घ्यायच्या. त्यांना आठवतंय की आंदोलनात नियमित भाग घेणारा एक किशोरवयीन मुलगा एकदा त्यांच्या शेजारी उभा होता आणि अचानक वेगाने आलेल्या एका गाडीने त्याला चिरडलं. त्याच्या शेजारी असलेला एक माणूससुद्धा मारला गेला. आणि दुसरा एक कायमसाठी जायबंदी झाला. “मी आणि माझा नवरा अक्षरशः मरणाच्या दारातून परत आलोय. त्या दिवसापासून अपघातात मरण येईल ही भीतीच निघून गेली. ज्या दिवशी कायदे रद्द करण्यात आले त्या दिवशी माझ्या शेजारी उभा असलेला तो मुलगा मला आठवला आणि मला रडूच कोसळलं,” कुलदीप सांगतात. या आंदोलनामध्ये शहीद झालेल्या ७०० हून अधिक शेतकऱ्यांच्या आहुतीचीही त्या आठवण ठेवतात.
शेतकरी आंदोलनात या स्त्रियांनी इतका मोलाचा आणि कळीचा सहभाग घेतला आणि त्यामुळेच आंदोलनापुढे झुकत केंद्र सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले पण पंजाबच्या या बायांना मात्र आता राजकीय निर्णयप्रक्रियेत आपल्याला बाजूला सारलं गेलंय असं वाटायला लागलंय. २० फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अगदी बोटावर मोजण्याइतक्या महिलांना उमेदवारी देण्यात आली, त्यातूनच काय ते सिद्ध होतं असं त्यांचं म्हणणं आहे.
पंजाबातल्या २.१४ कोटी मतदारांमध्ये जवळपास निम्म्या महिला आहेत. तरी देखील एकूण ११७ मतदारसंघात निवडणूक लढणाऱ्या १,३०४ उमेदवारांपैकी केवळ ९३, म्हणजेच ७.१३ टक्के महिला उमेदवार होत्या.
पंजाबातला सगळ्यात जुना राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने फक्त पाच बायांना उमेदवारी दिली आणि काँग्रेसने ११ स्त्रियांना. उत्तर प्रदेशात निवडणुकीचं घोषवाक्य असलेली ‘ल़डकी हूँ, लड सकती हूँ’ ही घोषणा पंजाबात मात्र स्वप्नवतच राहिलेली दिसली. आम आदमी पक्षाच्या महिला उमेदवारांची संख्या काँग्रेस पक्षापेक्षा एका आकड्यानेच जास्त. भारतीय जनता पक्ष, शिरोमणी अकाली दल आणि नव्याने स्थापन झालेल्या पंजाब लोक काँग्रेस या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सदस्य त्रिकुटाने मिळून ९ महिलांना तिकीट दिलं (भाजपच्या ६ उमेदवारांसह).
*****
माझी राजिंदर कौर यांची गाठ पडली ती हिवाळ्यात. हवेत गारवा आणि ओलावा. त्या खुर्चीत बसल्या होत्या. मागच्या भिंतीवर दिव्याचा अंधुकसा प्रकाश पडला होता. पण राजिंदर खरोखर तळपतात. मी माझी वही उघडली आणि त्यांनी त्यांचं मन. त्यांच्या डोळ्यातलं तेज त्यांच्या आवाजात उतरतं आणि स्त्रियांच्या नेतृत्वातच क्रांती होईल ही आशा व्यक्त होत राहते. त्यांच्या दुखऱ्या गुडघ्यांमुळे त्यांना विश्रांती घ्यावी लागते. पण राजिंदर सांगतात की शेतकरी आंदोलनामुळे त्यांच्यात प्राण फुंकला गेलाय. त्या सभांमध्ये बोलल्या आणि आतला आवाज त्यांना गवसल्याचं त्या सांगतात.
“आता मीच माझा निर्णय घेणार [कुणाला मत द्यायचं ते],” राजिंदर म्हणतात. “आधी कसं माझे सासरे किंवा पती 'या पार्टीला किंवा त्या पार्टीला मत दे' असं सांगायचे. पण आता मला काहीही सांगण्याची कुणाची हिंमतच होत नाही.” राजिंदर यांचे सासरे शिरोमणी अकाली दलाचे समर्थक होते पण राजिंदर लग्नानंतर त्या दौन कलां इथे रहायला आल्या तेव्हा सासऱ्यांनी काँग्रेस पक्षाला मत द्यायला सांगितलं होतं. “मी पंजाला मत दिलं. पण असं वाटलं होतं की कुणी छातीत गोळी घातलीये,” त्या सांगतात. त्यांचे पती त्यांना कुणाला मत दे असं काही सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या त्यांना चक्क गप्प करतात.
सिंघुमध्ये घडलेला एक मजेशीर प्रसंग त्यांना आठवतो. मंचावर त्यांनी नुकतंच भाषण दिलं होतं. “गुडघ्याला जरा आराम मिळावा म्हणून मी शेजारच्या एका तंबूत गेले. तिथे एक बाप्या स्वयंपाक बनवत होता. तो म्हणाला, ‘आता एक बाई बोलत होती, ऐकलं का?’ तितक्यात दुसरा एक तिथे आला आणि त्यानं मला ओळखलं. म्हणाला, ‘अरे, आताच यांनी भाषण दिलं.’ दोघंही माझ्या बद्दलच बोलत होते!” त्या म्हणतात. आवाजातली खुशी आणि अभिमान खुलत जातो.
“या तीन कायद्यांनी आमची एकजूट केलीये,” त्या म्हणतात. पण आंदोलनाची निष्पत्ती काय याबद्दल मात्र त्या साक्षेपी आहेत. “आंदोलनाने तिन्ही कायदे रद्द झाले हे खरं आहे पण आमच्या समस्या होत्या तशाच राहिल्या,” त्या म्हणतात. “एमएसपी [किमान हमीभाव] मिळणार याची खात्री न करताच [संयुक्त किसान मोर्चातर्फे] आंदोलन मागे घेतलं गेलं. शिवाय लखीमपूर खेरीमध्ये जे शेतकरी मारले गेले त्यांना न्याय मिळेल याचीही हमी घ्यायला पाहिजे होती.”
“शेतकरी संघटना तिथे एकत्र होत्या पण आता त्यांच्यात फूट पडली आहे,” कुलदीप नाराजीत म्हणतात.
२०२२ च्या निवडणुकांचं पडघम वाजायला लागलं आणि पंजाबमध्ये माझं अनेकांशी बोलणं झालं. बहुतेकांची पसंती कुण्या एका पक्षाला नाही असंच जाणवतंय. आणि यात डिसेंबर २०२१ मध्ये संयुक्त किसान मोर्चामध्ये सहभागी असणाऱ्या काही शेतकरी संघटनांनी सुरू केलेल्या संयुक्त समाज मोर्चाचीही गणती होते. (या पक्षाचे उमेदवार - चार महिलांसह - अपक्ष म्हणून उभे आहेत .) निवडणुकीची हवा तापू लागली आणि कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाला किंवा कार्यकर्त्यांना अगदी काहीच महिन्यांपूर्वी आंदोलनामध्ये शहीद झालेल्या आंदोलकांचा विसर पडला. सगळे मूग गिळून गप्प आहेत.
“संयुक्त समाज मोर्चा किंवा अगदी आम आदमी पार्टीलाही गावाच्या समस्यांमध्ये शून्य रस आहे,” संगरूर जिल्ह्यातल्या बेन्रा गावातली जीवन ज्योत ही तरुणी सांगते. “[राजकीय] पक्षाच्या लोकांना कोण जिवंत राहिलं, कोण मरून गेलं हेही माहित नाहीये,” हताश होत ती सांगते.
शाळेत शिक्षिका असणारी २३ वर्षांची जीवन ज्योत घरी मुलांच्या शिकवण्या घेते. तिची शेजारीण पूजा बाळंतपणात वारली आणि त्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांचा जीवन ज्योतला संताप यायला लागला. “मला सगळ्यात दुःख या गोष्टीचं आहे की कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता, गावचा सरपंच त्या कुटुंबाला किमान उपचार म्हणूनसुद्धा भेटायला आला नाही.” नवजात बाळ आणि तिची तीन वर्षांची बहीण गुरप्यार या दोघींची जबाबदारी त्यांच्या वडलांवर, ३२ वर्षीय सत्पाल सिंग याच्या खांद्यावर येऊन पडली तेव्हा जीवन ज्योत मदतीला आली.
मी बेनरा मध्ये जीवन ज्योतला भेटलो तेव्हा गुरप्यार तिच्या शेजारी बसली होती. “आता तर वाटतं की मीच तिची आई आहे,” जीवन म्हणते. “मला तिला दत्तक घ्यायचंय. मला स्वतःचं मूलबाळ होत नाही म्हणून मी हा निर्णय घेते अशा वावड्यांना मी घाबरत नाही.”
शेतकरी आंदोलनात महिला होत्या म्हणून जीवन ज्योतसारख्या तरुण स्त्रियांच्या मनात आशा चेतली. आपल्या पुरुषप्रधान जगात स्त्रियांना वेगवेगळे लढे लढावे लागतात, ती म्हणते, आणि “ही झुंज देण्याची ऊर्मीच” कृषी कायद्यांविरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनात दिसून आली.
चळवळीमुळे संघटित झालेल्या स्त्रिया परखड शब्दात आता मुख्य प्रवाहातून बाहेर फेकलं गेल्याची भावना बोलून दाखवतात आणि त्याबद्दल नाराजी व्यक्त करतात. “पूर्वापारपासून स्त्रियांना फक्त चूल आणि मूल असं बांधून ठेवलंय,” हरजीत म्हणतात. जनआंदोलनातून बाजूला पडणं आणि चार पावलं पुन्हा माघारी जाणं त्यांना सतावतंय. त्यांना मिळालेला मान आणि आदरदेखील आंदोलनाच्या इतिहासातली केवळ एक तळटीप बनून जाईल की काय हीच चिंता त्यांना लागून राहिली आहे.
या वार्तांकनासाठी मुशर्रफ आणि परगत यांनी मोलाची मदत केली, त्यासाठी त्यांचे आभार.
अनुवादः मेधा काळे