द्रौपदी शबर पदराच्या टोकाने डोळे पुशीत राहतात. डोळ्याचं पाणी खळतच नाही. ओडिशाच्या गुडाभेली गावात आपल्या घराबाहेर त्यांची दोन नातवंडं, तीन वर्षांचा गिरीश आणि नऊ महिन्यांचा तान्हा विराज आजीपाशी बसून शांतपणे खेळतायत. आपल्या नातीच्या, तुलसाच्या मृत्यूचा शोक करणाऱ्या ६५ वर्षांच्या द्रौपदीला घरचे बाकी लोक शांत करण्याचा प्रयत्न करतायत.
“आता ‘माझी बाळी गं’ असं कुणाला म्हणायचं सांगा?” त्या स्वतःशीच बोलत राहतात.
तुलसाचं कुटुंब शबर आदिवासी आहे. नुआपाडाच्या खरियार तालुक्यातल्या आपल्या गावी विटामातीच्या घराबाहेर चवाळ टाकून सगळे बसले आहेत. तुलसाचा अचानक मृत्यू झाला तो धक्का अजून विरलेला नाही. तिची आई पद्मिनी आणि वडील देबानंद यांना नातवंडांचं, खास करून विराजचं कसं काय होणार याची काळजी लागून राहिली आहे. विराज तर अजूनही आईच्याच दुधावर होता. “माझी सून पद्मिनी आणि मी आळीपाळीने दोघांचं सगळं करतोय,” द्रौपदी सांगतात.
या लेकरांचा बाबा, भोशिंधु इथे नाही. पाचशे किलोमीटर दूर तेलंगणाच्या पेड्डापल्ली जिल्ह्यातल्या रंगापूर गावात एका वीटभट्टीवर तो कामाला गेला आहे. २०२१ साली डिसेंबर महिन्यात तो, त्याची आई आणि तुलसाची धाकटी बहीण दिपांजली असे तिघं सहा महिन्यासाठी भट्टीवर कामाला गेले. तिथे दिवसाला त्यांना अंदाजे २०० रुपये मजुरी मिळणार होती.
२४ जानेवारी २०२२ रोजी २५ वर्षांची तुलसा शबर चानतामालमध्ये आपल्या घरी होती. गुडाभेलीपासून हे गाव २० किलोमीटरवर आहे. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक तिच्या पोटात प्रचंड वेदना व्हायला लागल्या. “मी तिला खरियारच्या तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन गेलो,” तिचे सासरे ५७ वर्षांचे दसमू शबर सांगतात. “डॉक्टरांनी सांगितलं की तिची तब्येत गंभीर आहे. नुआपाडाच्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जा असं ते म्हणाले. तिथे पोचेपर्यंत तुलसानी प्राण सोडला.”








