बकऱ्या, मेंढ्या, कोंबड्या, रेडे, कंद, पानं आणि फळं – नियामगिरीच्या वार्षिक सणात कशाची कमी नाही. ओडिशाच्या नैऋत्येकडच्या रायगड आणि कलहंडी जिल्ह्यातले आदिवासी इथे मोठ्या संख्येने गोळा होतात.
दर साली २२ ते २५ फेब्रुवारी दरम्यान, सुगीनंतर लगेचच नियाम राजाला वंदन करण्यासाठी सगळे डोंगरिया कोंढ गोळा होतात. नियामगिरीच्या या पर्वतरांगा म्हणजे त्या कायद्याच्या राजाचीच रुपं आहेत. नियामगिरीच्या वार्षिक सणाचा हा काळ. हा सोहळा तेव्हापासून सुरू आहे जेव्हा “जगाच्या या भागात कोणतंच सरकार वगैरे काही नव्हतं, इथे [फक्त] डोंगरियाच राहत होते,” लोडो सिकोका सांगतात. “त्या काळी,” ते सांगतात, त्यांचे लोक, “सुखी होते, मुक्तपणे आणि सन्मानाने जीवन जगत होते, स्वतःची भाषा बोलत होते. घनदाट जंगलं होती, झरे वाहत होते आणि सर्वत्र पशुपक्षी नांदत होते.” सिकोका डोंगरिया कोंढ आहेत आणि बॉक्साइटच्या खाणींपासून या प्रदेशाचं आणि आदिवासींचं रक्षण करण्यासाठी स्थापन झालेल्या नियामगिरी सुरक्षा समिती या संघटनेचे नेते आहेत.
“आदिवासी निसर्ग आणि पर्यावरण सोडून कोणत्याच देवतेची उपासना करत नाहीत,” लिंगराज आझाद सांगतात. ते समितीचे समन्वयक आहेत आणि कलहांडी जिल्ह्यातील केसिंगास्थित कार्यकर्ते आहेत. “कुई भाषेमध्ये ते ‘धरणी पेनू’ म्हणजेच धरतीमातेची आणि ‘होरू’ म्हणजे पर्वत किंवा पितृदेवाची उपासना करतात. जल, जंगल, वृक्ष आणि वायूलाही जीवनाधार मानलं जातं आणि त्यांचीही उपासना केली जाते. आणि म्हणूनच जेव्हा [सरकारने] ही भूमी वेदांताला खाणकामासाठी देण्याचं ठरवलं तेव्हा आम्ही त्याचा कडाडून विरोध केला.”
किती तरी काळापासून डोंगरिया आदिवासींनी सरकारी मालकीच्या ओडिशा खनिकर्म महामंडळ आणि स्टर्लाइट इंडस्ट्रीज (आता वेदांता) या ब्रिटिश बहुराष्ट्रीय कंपनीच्या प्रकल्पाला विरोध केला आहे. ओडिशाच्या लांजीगड तहसिलातल्या वेदांताच्या शुद्धीकरण प्रकल्पासाठी नियामगिरींच्या पर्वतरांगांमध्ये (अल्युमिनियम निर्मितीसाठी) बॉक्साइटचं उत्खनन या प्रकल्पामध्ये करण्यात येणार होतं. डोंगरिया कोंढ आदिवासींच्या १२ ग्रामसभांनी आणि इतर आदिवासी समूहांनी २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आलेल्या जनादेशाद्वारे कोणत्याही प्रकारच्या खाणकामाला विरोध नोंदवला होता. तरीही ओडिशा सरकारने या परिस्थितिकीसंदर्भात संवेदनशील असणाऱ्या डोंगररांगांमध्ये खाणकामाला परवानगी द्यावी यासाठी याचिका दाखल करणं थांबवलेलं नाही.
















