रस्त्यात पडलेली एक फांदी जमिनीवर आपटत थलकम्मा ए. के. नारळाच्या वाडीत आल्याचं जाहीर करतात. “झाडझाडोरा वाढलेल्या या जागेत येताना काळजी घ्यावी लागते. काठी आपटायची आणि आवाज करायचा. एखादा साप-बिप असला तर तो निघून जातो,” नारळाच्या उंचच उंच झाडांखाली वाढलेला झाडा, वेली आणि खाली पडलेल्या झापांमधून वाट काढत जात असलेल्या थनकम्मा म्हणतात.
एर्णाकुलमच्या निवासी वसाहतीतल्या एका रिकाम्या भूखंडात रान माजलंय. “वाटेत चांगले नारळ मिळाले तर मग नशीबच म्हणायचं!” ६२ वर्षांच्या थनकम्मा अशा मोकळ्या रानात पडलेले नारळ गोळा करतात, विकतात आणि आपलं पोट भरतात. मल्याळी स्वयंपाकात नारळाचा सढळ वापर होत असल्याने वर्षभर त्याला चांगलीच मागणी असते.
“पूर्वी काम संपलं की मी [पुतिया रोड जंक्शन] या परिसरात नारळ गोळा करायचे. पण आता वेगवेगळी दुखणी मागे लागलीयेत त्यामुळे मला जाणं होत नाही,” कंबरभर वाढलेल्या गवतातून माग काढत थनकम्मा पुढे जातात. थोड्या थोड्या अंतराने श्वास घ्यायला थांबत, वरती नारळ पाहत, दुपारच्या टळटळीत उन्हात डोळ्यावर हात धरत त्या आपलं काम सुरू ठेवतात.
पाच वर्षांपासून थनकम्मांना थायरॉइडशी संबंधित त्रास व्हायला लागले. धाप लागणं, खूप थकवा आणि इतर काही समस्या सुरू झाल्या. त्या घरकाम करायच्या ते काम सुटलं आणि महिन्याला मिळणारा ६,००० रुपये पगारही थांबला. थनकम्मांना घरी बसून चालणार नव्हतं. पैसे कमवायलाच लागणार होते. त्यामुळे मग त्या शेजारच्याच घरांमध्ये सामान सुमान पुसणं, अंगण झाडणं अशी थोडी हलकी कामं करू लागल्या. कोविड-१९ ची महासाथ आणि तेही काम थांबलं.














