पंड्ला लक्ष्मण राव यांना १२वी नंतर शिक्षण घेता आलं नाही. त्यावेळी ते १८ वर्षांचे होते. “मला अश्वरावपेटा येथील महाविद्यालयात [प्रवेश घेण्यासाठी] जातीचा दाखला सादर करायला सांगितलं होतं; पण माझ्याकडे जातीचा दाखला नसल्याने मला शिक्षण मध्येच सोडून द्यावं लागलं,” ते म्हणतात.
आता २३ वर्षीय लक्ष्मण आपल्या एक एकर पोडू मध्ये (शेतीकरिता वापरण्यात येणारी वनजमीन) काम नसलं की नायकुलगुडेम पाड्यावर शेतमजुरी करतात.
पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील तिरुनरसापुरम् आणि चिंतलपुडी या मंडलांतील जवळपास ३० गावांत राहणाऱ्या नायकपोड जमातीच्या तरुणांची व्यथा काही वेगळी नाही. कुशिनी सीता आणि कुशिनी नागमणी या दोघींनाही इयत्ता ५ वीनंतर शिक्षण सोडावं लागलं कारण त्यांना त्यांच्या वस्तीपासून ५ किमी दूर असलेल्या मर्रीगुडेम येथील आदिवासी निवासी शाळेत आदिवासी असल्याचा दाखला सादर करायला सांगण्यात आलं. “आम्ही पुढे शिकू शकणार नाही,” नागमणी म्हणते, “मग आमचं लवकर लग्न लावून दिलं जाईल आणि मग एकतर पोडू जमिनीवर काम करायचं किंवा कुणा दुसऱ्याच्या जमिनीवर शेतमजूर म्हणून राबायचं.”
नायकुलगुडेम (नायकपोड या जमातीवरून आलेलं नाव) येथे अशीच १०० आदिवासी कुटुंबं राहतात. जवळच्याच वनजमिनीवर भात, राजमा आणि इतर पिकांचं उत्पादन घेतात. आपल्या उदरनिर्वाहासाठी ते येथील जंगलावर अवलंबून आहेत. जंगलातून मध गोळा करायचा, स्कंक या प्राण्याची शिकार करायची (खाण्यासाठी) आणि तिरुनरसापुरम् येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात ते विकायचं.






